उरण : पावसाळ्याच्या चार महिन्यांत हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली असताना आता पुन्हा धुरके पसरल्याने उरणमधील हवा गुणवत्ता ढासळली आहे. गुरुवारी हवा गुणवत्ता निर्देशांक १५० ते १९७ पर्यंत पोहोचला होता. यात ऑक्टोबर हिटचे तापमान आणि वाहनांमुळे धूलिकणांतही वाढ झाली होती. गुरुवारी सकाळी उरणच्या काही भागांत धुरके पसरून दृश्यमानता कमी झाल्याचेही पाहायला मिळाले.
पावसामुळे उरणच्या हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा झाली होती. गेले चार महिने हा हवा गुणवत्ता निर्देशांक ३० ते ४० अंकांच्या दरम्यान नोंदविला गेला होता. उरण परिसरात वातावरणात धुकेसदृश वातावरण पसरले होते. या आल्हाददायक वातावरणात अनेक महिने धोकादायक हवा प्रदूषणाचा सामना करणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दुसरीकडे सर्वत्र हिरवळ आणि द्रोणागिरी डोंगरावर ढगांची दाटीही झाल्याचे नयनरम्य दृश्य होते. पावसाच्या वातावरणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक कमी आल्याने कार्बन मोनोऑक्सिड, नायट्रोजन डायऑक्साई, ओझोन व सल्फर डायॉक्साईड यांचे प्रमाण समाधानकारक होते. तर सातत्याने यामध्ये सुधारणा झाली होती. मात्र आता उरणच्या वाढत्या हवा प्रदूषण, तापमान आणि आर्द्रतेचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.
नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना
गेल्या अनेक महिन्यांपासून उरण यामध्ये २०० पेक्षा वर हवेचा निर्देशांक नोंदविण्यात येत होता. ही हवेची प्रदूषित मात्रा मानवी शरीसाठी अतिशय हानीकारक आहे. बदलत्या वातावरणात वाढते तापमान आणि आर्द्रतेतही वाढ झाली आहे. हवेतील वाढते धुळीचे प्रमाण याचा परिणाम येथील नागरिकांच्या शरीरावर होत आहे. गेल्या काही वर्षांपासून उरण हे देशातील हवेतील धूलिकणांच्या कक्षेतील शहरांत नोंदविण्यात आला आहे. अनेकदा अतिशय धोकादायक असलेल्या हवेचा निर्देशांक (एक्यूआय) ३०० पार पोहोचला होता. ही आकडेवारी हवेतील प्रदूषणाची उच्च पातळी मानली जात आहे. यामुळे जागतिक आरोग्य संस्थेने दक्षता घेत येथील नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करण्याची सूचना करण्यात येत आहे.
हवेची गुणवत्ता पात्रता
हवेतील प्रदूषणाची मात्रा ही ० ते ५० चांगली, ५० ते १०० मध्यम, १०० ते १५० आजारी व श्वसन विकारासाठी हानीकारक तर १५० ते २०० ची मात्रा ही आरोग्यास प्रचंड हानीकारक मानली जाते. या मात्रेनुसार उरणच्या हवेतील प्रदूषणाची मात्रा ही माणसासाठी प्रचंड हानीकारक बनली आहे. या हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे उरणमधील ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना श्वसनाचे आजार होत आहेत.