उरण : महात्मा गांधीनी १९३० मध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी कायदेभंग आंदोलन सुरू केले होते. यात जंगल सत्याग्रह करून कायदा भंग केल्याने चिरनेर मध्ये २५ सप्टेंबर १९३० ला ब्रिटिश सरकारने केलेल्या गोळीबारात येथील आठ स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. या हुतात्म्यांची स्मारके त्यांच्या मूळ गावी उभारण्यात आली आहेत. या स्मारकांची दुरावस्था झाली असून त्यांची लवकरात लवकर पुनर्बांधणी न केल्यास ही स्मारके उध्वस्त होण्याची शक्यता आहे. मात्र याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती या दोन्ही विभागाकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात आहे.

स्वातंत्र्य लढ्यातील सुवर्णपान असलेल्या या हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी सरकारने १९८० च्या दशकात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून चिरनेर, खोपटे,कोप्रोली,पाणदिवे,मोठीजुई,धाकटी जुई आणि दिघोडे येथे ही स्मारके उभारली आहेत. यामध्ये धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर)आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), रामा बामा कोळी (मोठी जुई), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रघुनाथ मोरेश्वर शिंदे (कोप्रोली), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर) यांची चिरनेर, दिघोडे, धाकटी जुई, मोठीजुई, कोप्रोली, खोपटे व पाणदिवे या मूळ गावी हुतात्मा स्मारके उभारली आहेत. या सर्व समारकांची (चिरनेर वगळता) दुरावस्था झाली आहे.

स्वातंत्र्य लढ्यातील बलीदानाची प्रेरणस्थळे असलेली ही स्मारके जमीनदोस्त होण्याच्या स्थितीत आहेत. यातील काही स्मारकांचा गावातील नागरिक आपले खाजगी साहित्य घेण्यासाठी तसेच इतर कामांसाठी वापर करीत आहेत. अनेक स्मारकाच्या फारशा उखडल्या आहेत. छप्पर उडाले आहेत. स्मारकातील छत गळून पडले आहेत. त्याचप्रमाणे संरक्षक जाळ्याही तुटल्या आहेत. यातील अनेक स्मारकांची पडझड झाली आहे. तर काही स्मारकांचा राहण्यासाठी वापर केला जात आहे. या उध्वस्त होणाऱ्या स्मारकांच्या तातडीच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे. परंतु या स्मारकांची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाने,पंचायत समिती ने करायची हे निश्चित होत नसल्याने यात भर पडू लागली आहे.

२५ सप्टेंबर १९३० ला चिरनेर गावाजवळील अक्कादेवीच्या जंगलात आक्रमक स्वरूपाचा जंगल सत्याग्रह झाला. सविनय कायदेभंगाच्या या चळवळीत अनेकांनी लाठ्या गोळ्या खात हौतात्म्य पत्करले. त्या हुतात्म्यांची स्मृती जागविण्यासाठी पूर्वीच्या कुलाबा व आजच्या रायगड जिल्ह्यातील चिरनेर गावी २५ सप्टेंबर रोजी, हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९५ वा हुतात्मा स्मृतीदिन आयोजित करण्यात आला आहे. या स्मृतीदिन चिरनेर ग्रामपंचायत, रायगड जिल्हा परिषद व उरण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. यावेळी शासकीय मानवंदना दिली जाते. पोलिसांकडून दुपारी १२ वाजताच्या ठोक्याला बंदुकीच्या तीन फैरी झाडून ही मानवंदना दिली जाते. त्यांनतर येथील स्मारकाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहन्यात येते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकांची उभारणी केली आहे. त्यानंतर ही स्मारके संबंधित ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.

स्मारके स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत कडे असली तर त्याची किरकोळ दुरुस्ती करणे शक्य आहे. मात्र या स्मारकांच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून निधीसाठी येथील कंपनीकडे सीएसआर फंडाची मागणी केली जाणार असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी दिली आहे.

गुरुवारी ९५ वा स्मृतीदिन

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९५ व हुतात्मा स्मृतिदिन साजरा करण्यात येणार असून यासाठी राज्याचे मंत्री भरत गोगावले, मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आ. महेश बालदी, आ. प्रशांत ठाकूर,आ. विक्रांत पाटील,माजी आ. मनोहर भोईर, बाळाराम पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योगपती पी.पी. खारपाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, जेएनपीटीचे चेअरमन उन्मेश वाघ, राजिपचे मुख्य कार्यअधिकारी आदीजण उपस्थित राहणार असल्याची माहिती सरपंच भास्कर मोकल यांनी दिली.

चिरनेर स्मारकाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पडून : २५ सप्टेंबर या दिवशी आदरांजलीचा मुख्य समारंभ चिरनेर मध्ये होतो. त्यामुळे या स्मारकाच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव ऑगस्ट मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्याला मंजुरी मिळालेली नाही.