उरण : येथील महामार्ग अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांपासून मुक्त करण्यासाठी जेएनपीएने पुढाकार घेतला. गुरुवारी जेएनपीए वाहतूक विभाग, बंदरातील अधिकारी, गोदाम प्रशासन, वाहतूक पोलीस यांची बैठक झाली. या बैठकीत मार्गावर उभी करण्यात येणारी वाहने हटविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कंटेनर वाहनमुक्त मार्ग होण्याची आशा निर्माण झाली आहे.
उरणमधील विविध सामाजिक संस्थांनी मिळून अपघात निवारण समिती स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी बैठक घेऊन मुख्य व सेवा मार्गावर उभी करण्यात येणाऱ्या जड कंटेनर वाहने मुक्त मार्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर त्याचा आढावा घेण्याचेही ठरविण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. उरण व जेएनपीटी बंदर परिसरातील वाढत्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या जड कंटेनर वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी येथील सामाजिक संस्थानी केली होती.
याची दखल घेत काकडे यांनी जेएनपीटी अधिकारी क्लब मध्ये जेएनपीए, राष्ट्रीयमहामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, विविध गोदाम आणि आयात निर्यात विभागातील अधिकारी आणि वाहतूकदार यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत वाहतुकीशी संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना या अपघाताना रोखण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याची सूचना करण्यात आली.
जेएनपीएच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जेएनपीएचे विश्वस्त दिनेश पाटील,माजी विश्वस्त भूषण पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील आदी उपस्थित होते.
सूचना
- सेवा मार्गावर वाहने उभी करू नयेत.
- वाहन चालकांसाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात यावा.
- बंदर विभागाने मागणी पेक्षा अधिक वाहने गोदाम परिसरात मागवू नये.
- खड्डे असलेल्या मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी.
- मार्गांना सुरक्षा पट्टे मारण्यात यावेत. तसेच पथदिवे सुरू करावेत.
जेएनपीएकडून आढावा बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला जेएनपीए प्रशासन, येथील कार्यान्वीत बंदराचे प्रतिनिधी, कंटेनर यार्ड आणि गोदाम चालक यांची बैठक घेण्यात आली. त्यानुसार वाहतूक विभागाला आवश्यक त्या सुविधा पुरविण्याची चर्चा करण्यात आली. – एस. के. कुलकर्णी, व्यवस्थापक, जेएनपीए बंदर वाहतूक विभाग
कंटेनर वाहनमुक्त महामार्ग करण्यासाठी वाहतूक विभागाने कामाला सुरुवात केली आहे. येथील सर्व मार्ग मोकळे केले जात आहेत. मात्र या वाहांनवर कारवाई करण्यासाठी लागणारी क्रेन, टोईंग वाहन, वाहनतळ आदींची उपलब्धता करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.- अतुल दहिफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण वाहतूक विभाग