नवी मुंबई : सणासुदीच्या हंगामात वाशीचा मुख्य रस्ता अडवून बसणारे फेरीवाले, फटाके विक्रेते तसेच बेकायदा खाद्य विक्रेत्यांवर महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयाने उशीरा का होईना कारवाई करण्यास सुरुवात केली. चार दिवस या सगळ्या प्रकाराकडे डोळेझाक केल्यानंतर नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्याने अखेर सोमवार आणि मंगळवार असे सलग दोन दिवस अतिक्रमण विरोधी पथकाला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. दरम्यान या कारवाईमुळे काही काळ रस्ते रिकामे झाल्याने वाशी ते कोपरखैरणे हा प्रवास पुर्ववत झाला. मात्र महापालिका पथकाची पाठ फिरताच सायंकाळी उशीरा पुन्हा याठिकाणी फेरीवाले गर्दी करत असल्याचे चित्र होते.

वाशी सेक्टर ९, १० या परिसरात सणासुदीच्या काळात भरणारा फेरीवाले आणि विक्रेत्यांचा बाजार वाशीकरांना काही नवा नाही. विभाग कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे याठिकाणी अघोषीत सणांचा बाजार भरु लागल्याने वाशीच नव्हे तर शहरातील वेगवेगळ्या उपनगरांमधील नागरिकही येथे येऊ लागले आहे. ‘दिवाळी आहे मग खरेदीचा बाजार भरणारच’ असा पवित्रा अलिकडच्या काळात अधिकारी वर्गातील एक मोठा गट घेऊ लागल्याने या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करुन घेणाऱ्यांचीही सध्या चलती सुरु झाली आहे. ‘दिवाळीचा बाजार’ या नावाखाली मानखुर्द, गोवंडी, कळवा, मुंब्रा, भांडूप, कांजुरमार्गचे फेरीवाल्यांनाही या संपूर्ण भाग आंदण दिल्यासारखी परिस्थिती आहे. सणांपुरता हा बाजार भरेल आणि दोन दिवसात रस्ते मोकळे होतील या आशेवर यंदा वाशी-कोपरखैरणे मार्गावर नियमीत प्रवास करणारे प्रवासी होते. प्रत्यक्षात मात्र सलग सात दिवसांचा हा बाजार अमिबाप्रमाणे फोफावत गेला आणि मुख्य रस्त्याच्या दोन मार्गिका अडवू लागल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांचे अतोनात हाल होत होते.

अखेर कारवाई…काही काळापुरती ?

दरम्यान यासंबंधी अनेक तक्रारी विभाग कार्यालय तसेच महापालिका आयुक्तांकडेही शहरातील काही सुजाण रहिवाशांकडून केल्या जात होत्या. या तक्रारींकडे फारसे गांभिर्याने कुणीही पहात नसल्याचे सुरुवातीचे चित्र होते. वाशीतील या दाटीवाटीने भरलेल्या बाजारात सर्रासपणे फटाक्यांची विक्रि कोणत्याही नियमाशिवाय सुरु होती. अखेर सोमवारी वाशी विभाग कार्यालयाला जाग आली आणि त्यांनी या बाजाराला आवर घालण्यास सुरुवात केली. मोती महल दुकान ते सेक्टर दहा पर्यतचा पदपथ, रस्त्यांचे कोपरे रिकामे करण्यात आले. दुपारी उशीरापर्यत ही कारवाई सुरु होती. दुपारी महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच पुन्हा सायंकाळी याठिकाणी फेरीवाले जमू लागले. ‘आमचे आणि विभाग कार्यालयाचे सात दिवसांचे ठरले होते, अचानक कशी कारवाई होऊ शकते’ या शब्दात काही फेरीवाले महापालिकेच्या पथकावरच गुरगुरताना यावेळी दिसत होते. ‘नेमके काय ठरले होते’ याविषयी मात्र विभाग कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी फार बोलायच्या मनस्थितीत यावेळी नव्हते.

शेतकऱ्यांच्या नावाने चांगभल

मराठवाड्यात मोठया प्रमाणार पाउस पडल्याने त्या भागातून मोठया प्रमाणावर शेतकरी येथे उदरनिर्वाहाचे कारण शोधून आला आहे, असे चित्र यानिमीत्ताने पद्धतशीरपणे उभे केले जात आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे यासारख्या शङरांमध्ये राज्यातील विवीध भागांतून सणासुदीला फुले तसेच वेगवेगळे साहित्य घेऊन विक्रिसाठी येणाऱ्यांची संख्या बरीच असते.

यंदा वाशीत मराठवाड्यातून काही शेतकरी फुल, हार, गजऱ्यांच्या विक्रिसाठी आले आहेत. काहींकडे आंब्याच्या झाडाची डहाळी, पारंब्या अशा वस्तूही आहे. मात्र अशा विक्रेत्यांचा आकडा जेमतेम आहे. ओल्या दुष्काळग्रस्तांच्या नावाने वाशीत भरवला गेलेला बाजारात मानखुर्द, गोवंडी, मुंब्य्रातून कोणते दुष्काळग्रस्त आले या प्रश्नाचे उत्तर मात्र विभाग कार्यालयाकडे सध्या तरी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, अतिक्रमण विभागाने या बाजारावर कारवाई केल्याची छायाचित्र अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डाॅ.कैलाश गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली. महापालिकेतून मात्र याविषयी कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. वाशीत लागलेल्या एका आगीच्या घटनास्थळाची पहाणी सकाळी आयुक्त कैलाश शिंदे यांनी केली. आयुक्तांचा दौरा असल्यामुळे वाशी विभाग कार्यालय सकाळपासून सतर्क होते. आयुक्त निवासस्थानाकडे रवाना झाल्यानंतर मात्र सेक्टर नऊचा बाजार पुन्हा भरु लागल्याचे चित्र होते.