नवी मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथे आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना स्कूल व्हॅनच्या झालेल्या अपघातात व्हॅन चालक सहित दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघात घडला त्यावेळी मदतीस काही लोक धावले, त्यावेळी चालकाने मद्य प्राशन केल्याचे दिसून आले आहे. मात्र या बाबत वैद्यकीय अहवाल आल्या नंतरच स्पष्ट सांगता येईल अशी माहिती पोलिसांनी दिली.
वाशीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात झाला आहे. वाशी सेक्टर नऊ कडून सेक्टर १६ शाळेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला आहे. अपघात झाला त्यावेळी स्कूल व्हॅन मध्ये दोनच विद्यार्थी होते. रस्ता काहीसा मोकळा असल्याने व्हॅन जोरात चालवण्याच्या नादात व्हॅन चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका अन्य गाडीला धडकली.
अपघात एवढ्या जोरात झाला कि व्हॅनची पुढची बाजू पूर्णपणे चेपून गेली. व्हॅनचे स्टेअरिंग वर व्हॅन चालक जोरात आदळला. तर व्हॅन मध्ये बसलेल्या दोन्ही विद्यार्थ्यां आतल्या आत समोरच्या सीट वर आदळून जखमी झाले. चालक विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थी किरकोळ जखमी असून ते आता स्वस्थ आहेत. व्हॅन चालकावर उपचार सुरु आहेत. अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली. व्हॅन चालकाने मद्य प्राशन केले होते का याबाबत मात्र वैद्यकीय अहवाल आल्यावर सांगता येईल असेही चांदेकर यांनी सांगितले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
अपघात घडला त्यावेळी आसपासच्या लोकांनी व्हॅन चालक आणि विद्यार्थाला व्हॅन बाहेर काढले. त्यावेळी व्हॅन चालकाच्या हालचाली आणि बोलणे मद्य प्राशन केलेल्या व्यक्ती प्रमाणे होत्या. त्यात तो स्टेअरिंग वर जोरात आदळल्याने त्याला मार बसल्याने त्याने सीट बेल्ट लावला नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याला जेव्हा रुग्णालयात आणले गेले तेव्हा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिली. या बाबत तपास पूर्ण झाल्यावर नेमके काय ते समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघात ग्रस्त वाहन बाजूला घेण्यासाठी अग्निशमन दलाची मदत घेण्यात आली.