वाशीतील राज्य विमा योजना कर्मचारी वसाहत अतिधोकादायक स्थितीत

मोडकळीस आलेले पिलर, फुटलेले जिने आणि कधीही कोसळणारे प्लास्टर.. वाशी येथील राज्य कामगार विमा योजना वसाहतीची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. शहरातील सिडकोनिर्मित धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनाचे घोंगडे भिजत पडलेले असताना सरकारी आस्थापना असलेल्या राज्य कामगार विमा योजना वसाहतीची अवस्थाही धोकादायक झाली आहे. दिवाळीत परिसरात फटाके फोडले जात असताना त्या आवाजांनी इमारत कोसळणार तर नाही ना, अशा भीतीने येथील रहिवासी जीव मुठीत धरून बसले होते.

नवी मुंबईत वाशी सेक्टर ४ येथे १९७५ च्यापूर्वी राज्य कामगार विमा योजना कर्मचारी, अधिकारी, वसाहती आणि रुग्णालय आहे. या वसाहतीत एकूण १६ इमारती व ३४६ निवासस्थाने आहेत. परंतु सध्या यापैकी काही इमारतींतच रहिवासी आहेत. अनेक इमारती अतिधोकादायक असून तेथून अनेक कामगारांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. जिथे रहिवासी आहेत, अशा इमारतींचेही जिने तुटले आहेत. काही इमारतींचे पिलर कधीही कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहेत. घरामध्ये स्वयंपाक करताना छताचे प्लास्टर जेवणात पडण्याची भीती येथील रहिवाशांना नेहमीच असते. आपल्या या अवस्थेकडे सरकार ढुंकूनही पाहत नसल्याबद्दल येथील रहिवासी नाराजी व्यक्त करतात.

या घरांसाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ३५०० ते ४००० रुपये कापून घेतले जातात, मात्र तरीही काही मूलभूत सुविधांपासून ते वंचित आहेत. याच वसाहतीशेजारी भव्य राज्य कामगार विमा योजना रुग्णालय तयार होत आहे. धोकादायक इमारतीत राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचा फक्त बाह्य़रुग्ण विभाग सुरू आहे, मात्र त्याची अवस्थाही वेगळी नाही. तेथील रुग्णवाहिका गंजल्या आहेत.

नवी मुंबई शहरात राज्य व केंद्र शासनाचे लाखो कर्मचारी रहातात. परंतु आपल्याच कर्मचाऱ्यांच्या विमा योजनेच्या रुग्णालयाकडे व त्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या घरांकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले आहे.

आधी मुसळधार पावसात आणि नंतर दिवाळीच्या फटाक्यांचे हादरे बसत असताना या रहिवाशांनी जीव मुठीत धरून दिवस ढकलले आहेत.

याबाबत येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक अलंकार खानविलकर यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही.

वाशी येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालय व वसाहतींबाबत वर्षांनुवर्षे पत्रव्यवहार व पाठपुरावा करत आहे. परंतु या वसाहतींकडे राज्य व केंद्र शासन दुर्लक्ष करत आहे. येथील राहत असलेले कर्मचारी अतिशय धोकादायक स्थितीत रहात असून कधीही इमारती कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. पालिकेने या इमारतींना धोकादायक घोषित केले आहे. परंतु पर्याय नसल्याने कामगार नाईलाजास्तव तेथे राहत आहेत.

– वैभव गायकवाड, माजी नगरसेवक

आम्ही नोकरी लागल्यापासून याच वसाहतीमध्ये रहात आहोत.  इमारत कधीही पडेल अशी स्थिती आहे. मोठा फटाका वाजला तरी पोटात भीतीचा गोळा येतो. त्यामुळे संबंधित आस्थापनांनी लक्ष द्यावे. पगारातून दरमहा ठराविक रक्कम कापून घेतली जाते. त्याचे होते काय असा प्रश्न पडतो. 

– प्रदीप मांडवकर, रहिवासी

इमारती धोकादायक घोषित केलेल्या आहेत. शहरातील ज्या इमारती अतिधोकादायक आहेत त्या रहिवाशांनी रिकाम्या कराव्यात यासाठी पोलिसांनीही पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे शहरातील अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना व त्या त्या आस्थापनांना इमारती रिकाम्या करुण्याबाबत पत्रव्यवहार करून सूचित केले आहे.

– अंकुश चव्हाण, अतिरिक्त आयुक्त