उरण : जसखार गावात उभ्या करण्यात आलेल्या वाहनाला सोमवारी आग लावण्याची घटना घडली आहे. आग तातडीने विझविण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या संदर्भात न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. गीतकार व नृत्य दिर्ग्दर्शक सचिन लहू ठाकूर यांचे हे वाहन आहे. सात महिन्यांपूर्वी त्यांच्याच वाहनाला आशा प्रकारे गावात आग लावण्यात आली होती. त्यानंतर या घटनेची पुनरावृत्ती करण्यात आली आहे.

पहाटे दीड वाजता वाहनाला आग लागली त्यावेळी सीएनजी टाकी व बाजूला रिक्षा व इतर वाहने होती. त्यांचाही  स्फोट होण्याची शक्यता होती. यापूर्वी घडलेल्या घटनेच्या वेळी आरोपीचा शोध न घेतल्याने माझे वाहन पुन्हा  जाळण्यात आले असून जर  त्या घटनेचा योग्य दिशेने तपास  पोलिसांनी केला असता तर पुन्हा ही घटना घडली नसती त्याचप्रमाणे यामुळे माझ्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे मत सचिन ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. जसखार गावात वाहन जळल्याच्या घटनेनंतर त्वरित वाहनाची पाहणी करून गुन्हा नोंदविला. आरोपी कोणीही असो. लवकरच त्याला पकडण्यात येईल. त्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली आहे.