शहरबात : विकास महाडिक

नवी मुंबई पालिकेने ‘सीटेक’ तंत्रज्ञानावर आधारित सात सांडपाणी प्रक्रिया केंद्राद्वारे अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी स्वच्छ करून ते उद्याने, मैदाने आणि नेरुळमधील अनिवासी भारतीय संकुलाच्या सुशोभीकरणासाठी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पालिका ९८ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करीत असल्याने पालिकेला किमान हगणदारी मुक्त स्पर्धेतील मानांकन देण्याशिवाय केंद्र सरकार पुढे पर्याय नाही.

स्वच्छ भारत अभियानाअंर्तगत देशातील एकूण चार हजार तीनशे शहरांच्या सर्वेक्षणानंतर नवी मुंबई हे शहर हगणदारीमुक्त शहरांच्या मानांकन स्पर्धेत पहिल्या पाच शहरांमध्ये आले आहे. नवी मुंबईला मिळालेले हे हगणदारी मुक्त शहराचे मानांकन म्हणजे स्वच्छ भारत अभियानातील क्रमांक नाही. अभियानातील पहिला क्रमांक पटकविण्यासाठी लागणाऱ्या निकषातील एक प्रमाण आहे. नवी मुंबईला स्वच्छ भारत अभियानाचा तिसरा क्रमांक मिळाला असा जावई शोध लावून काही नेटकऱ्यांनी पालिकेला झोडायला सुरुवात केली आहे. तिसरा क्रमांक येणार असेल तर इतका खर्च कशासाठी असे निर्थक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर नवी मुंबई पालिका राज्यात अव्वल येत आहे. राज्य सरकारने निर्माण केलेले हे एक नियोजन बद्ध शहर असल्याने हा सन्मान मिळत आहे. देशातील इंदूर, सुरत, दिल्ली, विशाखापट्टन, या शहरांनी हगणदारी मुक्त शहरासाठी राबविलेल्या निकषामध्ये नवी मुंबई आघाडीवर आहे. पालिकेने सीटेक तंत्रज्ञानावर आधारित सात सांडपाणी प्रक्रिया केंद्राद्वारे अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी स्वच्छ करून ते उद्याने, मैदाने आणि नेरुळमधील अनिवासी भारतीय संकुलाच्या सुशोभीकरणासाठी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पालिका ९८ टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करीत असल्याने पालिकेला किमान हगणदारी मुक्त स्पर्धेतील मानांकन देण्याशिवाय केंद्र सरकार पुढे पर्याय नाही. केंद्र सरकारच्या या अभियानाला राजकीय किनार आहे. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्र्नवादीचे आघाडी सरकार आहे. त्यामुळे या राज्यातील शहरांना एखादा चांगला पुरस्कार देणे हे एका अर्थाने त्या राज्याची प्रशंसा करण्यासारखे आहे. मात्र नवी मुंबई पालिका सांडपाण्यावर करीत असलेली प्रक्रिया ही देशात इतर ठिकाणी नाही. त्यामुळे हा ‘वॉटर प्लस’ मानांकन पालिकेला मिळणे क्रमप्राप्त होते. स्वच्छ भारत अभियानाची तयारी करताना पालिकेने मागील ऑक्टोबरपासून चांगलाच गृहपाठ केलेला आहे. यानिमित्ताने शहराची रंगरंगोटी करण्यात आली आहे. मुसळधार पावसात ही रंगरंगोटी काही ठिकाणी खराब झाली असली तरी या निमित्ताने चांगल्या कलाकारांच्या कलाकृतीला वाव मिळाला होता. हगणदारी मुक्त करण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. त्यासाठी गुड मॉर्निग पथकही नेमण्यात आले होते. उघडय़ावर शौच करणाऱ्या रहिवांशाना हे पथक गाठून गुलाबाचे फूल देऊन खजील करीत होते. उघडय़ावर शौचाला जाणे हे कोणालाही आवडणारे नाही. त्यासाठी सुविधा देणे आवश्यक होते. पालिकेने पाच हजार शौच कुप्या आणि २२० सार्वजिनिक शौचालये बांधलेली आहेत तर ३९४ कम्यनिटी शौचालये उभारलेली आहेत. या उपाययोजनामुळे यापूर्वीच शहर हगणदारी मुक्त झालेले आहे मात्र यात आता मानांकन मिळाल्याने स्वच्छ भारत अभियानात दोन क्रमांक वर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर झालेल्या सर्वेक्षणात पालिका घनकचरा वर्गीकरण व शहर स्वच्छ आणि सुशोभीकरणात मानांकनात वरच्या क्रमांकावर येणे आवश्यक आहे. हगणदारी मुक्त शहराच्या स्पर्धेत नवी दिल्ली आणि विशाखापट्टन ही दोन नवीन शहरे आलेली आहेत. यापूर्वी सुरत आणि इंदौर ही दोन शहरे नवी मुंबईला टक्कर देत आहेत. या दोन्ही शहरात भाजपाची सत्ता आहे हे या ठिकाणी लक्षात घेण्याची गरज आहे. नवी मुंबईसारख्या शहरात अजूनही कचऱ्याचे वर्गीकरण १०० टक्के होताना दिसत नाही. ग्रामीण व झोपडपट्टी भाग या प्रयत्नांना हरताळ फासताना दिसत आहेत. वर्गीकरण न करणाऱ्या नागरिकांचा कचरा उचलला जाणार नाही, असेही पालिकेने जाहीर केले आहे तरीही या अस्वच्छतेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. नागरिकांनी कचरा वर्गीकरण करून दिला तरी साफसफाई कामगार तो एकत्र करीत असल्याचेही आढळून आले आहे. त्या कामगारांवर व स्वच्छता निरीक्षकांवर कारवाई करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. केवळ हगणदारी मुक्त शहरांच्या यादीत मानांकन मिळाले म्हणजे पालिकेचा प्रश्न सुटला असे नाही. स्वच्छता ही एक निरंतर प्रक्रिया आहे. पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी हीच बाब सर्व अधिकाऱ्यांना समजवून सांगितली आहे. त्यासाठी सोसायटी, संस्था, व्यापाऱ्यांना रस्ते दत्तक योजना राबविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येकाने आपल्या नजरेसमोरच्या रस्ते, शौचालये, यावर नजर ठेवण्याची जबाबदारी उचलण्यासाठी ही दत्तक योजना आहे. यासाठी जनतेचे सहकार्य हवे आहे. नवी मुंबईची लोकसंख्या आता पंधरा लाखाच्या घरात गेली आहे. विशेष म्हणजे हे शहर सुशिक्षितांचे शहर म्हणून परिचित आहे. त्यामुळे या स्वच्छ भारत अभियानात प्रत्येक नागरिकाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असणे आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर पाहणी करण्यास येणाऱ्या पथकासाठी सर्व स्वच्छता तयार ठेवणे हा एक प्रकारचे नाटक झाले.

स्वच्छता ही अंगवळणी पडण्याची आवश्यकता असून तो एक उत्सव व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. या अपेक्षेत नवी मुंबईकर मात्र अपयशी ठरत असून नापास होत आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे पहिला क्रमांक मिळाला नाही तरी चालेल पण पहिल्या क्रमांकासारखे काम होणे हाच नागरिकांनी दिलेला पुरस्कार ठरणार आहे. सध्या स्वच्छतेबाबत थोडी शिथिलता आली आहे. ती जाऊन ही निरंतर प्रक्रिया प्रशासन आणि नागरिक राबवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.