स्थानिकांना दिलासा; नवी मुंबई, ठाणे, रायगडमधील पर्यटकांना फायदा
मोरा बंदर ते घारापुरी दरम्यान जलसेवा सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे घारापुरी बेटावरील रहिवासी आणि ठाणे, नवी मुंबई, रायगडमधून लेणी पाहण्यासाठी येणाऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
एलिफंटा बेटावरील लेणी पाहण्यासाठी मुंबईवरून लाँचने दररोज देश विदेशातील हजारो पर्यटक येतात. घारापुरीला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग सध्या उपलब्ध आहे. घारापुरी बेटावर तीन गावे आहेत. या गावांमध्ये आजही वीज नाही. माध्यमिक शिक्षणापुढे जाण्यासाठी येथील विद्यार्थ्यांना उरण गाठावे लागते. बेटावर पर्यटनाधारित व्यवसाय करण्यासाठी अनेकजण रोज ये-जा करतात. या सर्वाना खासगी बोटींवर अवलंबून राहावे लागते. वेळी अवेळी ये-जा करावी लागते. सुटीच्या दिवशी बेलापूर तसेच न्हावा येथून काही बोटी सोडल्या जातात. त्यात नियमितता न नसल्याने त्रासच सहन करावा लागतो. त्यामुळे या मार्गावर अधिकृतरीत्या जलसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडे मांडण्यात आला आहे. त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे देण्यात आल्याची माहिती मोरा येथील मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी ए. एन. सोनावणे यांनी दिली
गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी बेटे या प्रवासाला एक ते दीड तास लागतो. तर मोरा बंदर ते घारापुरी प्रवासाला अर्धा तास लागणार आहे. त्यामुळे तिकीट दरही कमी ठेवले जाणार आहेत. नवी मुंबई, ठाणे व राज्यभरातील पर्यटकांना उरण येथून घारापुरीला जाण्याचा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे घारापुरीतील पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
बेकायदा जलप्रवासाला चाप
घारापुरीला जाण्यासाठी गेट-वेशिवाय इतर कोठूनही अधिकृत जलवाहतूक होत नाही. त्यामुळे या मार्गावर बेकायदा जलवाहतूक केली जात आहे. या वाहतुकीत अपघात घडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.
अंतर कमी होणार
मुंबईतील उपनगरांतून एलिफंटाला जाण्यासाठी रेल्वे मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेट-वे ऑफ इंडिया असा एक ते दीड तासांचा तर त्यानंतर जवळपास गेट-वे ते एलिफंटा असा सव्वा तासांचा जलप्रवास करावा लागत आहे. मोरा प्रवासात केवळ दीड तासात एलिफंटाला पोहचता येईल. तर नवी मुंबईतून मुंबई ते एलिफंटा प्रवासासाठी तीन तास लागतात. तो एक तासावर येईल. ठाण्यावरूनही या जलप्रवासात तीन तासांऐवजी दोन तासांत प्रवास करता येईल. तसेच अलिबाग ते गेट-वे व एलिफंटा या तीन तासांच्या प्रवासात तर एक तास लागणार आहे.