दिवाळी साजरी करताना लहानग्यांचे डोळे जपा, हा महत्त्वाचा संदेश घेऊन एक सामाजिक संस्था अनेक दिवसांपासून पनवेल परिसरात काम करीत आहे. पनवेल परिसरात एका लग्न समारंभामध्ये रिमोटच्या साह्य़ाने फटाक्यांची आतषबाजी करताना एका लहानग्या मुलाच्या डोळ्यांना इजा झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी यंदा सुरक्षित चष्मे लावूनच फटाके फोडण्याचा आनंद घ्या, असे आवाहन या संस्थेचे कार्यकर्ते करीत आहेत. ज्या लहान मुलाच्या बाबतीत ही घटना घडली तिचे वडील म्हणजे डॉ. अमितकुमार नोहर यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. ऐरोली बर्न सेंटरचे डॉ. एस. केशवाणी यांचाही या मोहिमेत सहभाग आहे.
नवीन पनवेल वसाहतीमधील सीकेटी विद्यालयाच्या प्रांगणात एक लग्न समारंभ सुरू असताना तेथे दीड वर्षांचा वीरेन नोहर हा आपल्या आईसोबत उभा होता. यातील काही फटाक्यांमुळे त्याच्या डोळ्यांना दुखापत झाली. त्याच्यावर प्रथम मोहिते चाइल्ड केअर रुग्णालयात व नंतर लक्ष्मी आय इन्स्टिटय़ूटमध्ये उपचार करण्यात आले. काही महिन्यांनी वीरेनची दृष्टी सुधारली. मात्र फटाके फोडताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती नसल्याचे डॉ. अमितकुमार यांच्या लक्षात आले. यातूनच त्यांनी ही मोहीम हाती घेतली.
डॉक्टर फॉर रुरल इंडिया, डॉक्टर फॉर यू, नॅशनल बर्न सेटर, खारघर येथील आयटीएम कॉलेज या सर्वाचा या मोहिमेत सहभाग आहे. खारघर, पनवेल व उरण येथील आठ विद्यालयांमध्ये या संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना प्लॅस्टिकचे चष्मे घालण्याचे आवाहन केले आहे. फटाके फोडू नका, असे आवाहन सुरुवातीला मुलांना करण्यात येते. मात्र फटाके फोडण्याचा मोह न आवरल्यास ते फोडत असताना डोळ्यांना प्लॅस्टिकचे चष्मे लावण्याचे आवाहन या संघटनांचे प्रतिनिधी करीत आहेत.
सुरक्षित चष्म्यांसाठी..
या संघटनेने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर पन्नास रुपयांत सुरक्षित चष्मे उपलब्ध करून दिले आहेत. अधिक माहितीसाठी डीएफआरआय या फेसबुक पेजला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. अमित यांच्या ८६९३८३७७७२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.