आज एकटय़ा भारतात नैराश्य या विकारामुळे लोक मोठय़ा प्रमाणावर मानसिक आजारी आहेत. केवळ मोठी माणसंच नाहीत तर शालेय वयातल्या मुलांमध्येही कळत-नकळत निराशा मनात घर करून राहिली आहे.

नैराश्य किंवा निराशेचा मनोविकार जडण्याआधी माणसाला काय हवं होतं आणि काय मिळालं याचा विचार मानसोपचारतज्ज्ञ करत असतात. हा आजार कोणालाही होऊ  शकतो. तो वय, शिक्षण, कौटुंबिक,आर्थिक स्थिती काहीही बघत नाही. पटकन रडू येणं, जास्त झोप, जास्त खाणं किंवा अजिबात खावंसं न वाटणं, अनुत्साह, कशातच रस न वाटणं, काहीही करावंसं न वाटणं, एकूणच मरगळ वाटणं ही सगळी नैराश्याचीच लक्षणं आहेत. मेंदूमध्ये अशा आनंदी रसायनांचा अभाव निर्माण होतो आणि ताणकारक रसायनांचा प्रभाव वाढतो, तेव्हा निराशा माणसाच्या हाताबाहेर जाते.  इतरांच्या दृष्टीने क्षुल्लक वाटू शकणाऱ्या विषयांचा ज्यांना त्रास होतो, त्यांना निराशा घेरून टाकते. उदा. परीक्षेत कमी गुण, मित्र किंवा मैत्रिणींशी भांडणं, हव्या त्या विषयाला प्रवेश न मिळणं, हवी ती नोकरी/ काम करायला न मिळणं, सतत अपयश येणं या गोष्टी थोडय़ाफार फरकाने अनेकांच्या आयुष्यात होत राहतात. काहींच्या आयुष्यात अनपेक्षितरीत्या अशा काही वाईट घटना घडतात की त्यांना स्वत:ला सावरता येत नाही.  ज्यांना निराशेचा त्रास होतो आहे ते तर हे सहन करत असतातच, पण त्याचबरोबर त्यांच्या आसपास जी माणसं आहेत त्यांनाही त्रास होतो. जवळच्या नात्यांमध्ये ताण येतो. नैराश्य आलेल्या व्यक्तीच्या आयुष्याशी ज्या गोष्टी निगडित आहेत त्या सर्वावर नैराश्याचा परिणाम होतो.

यासाठी पहिल्या पायरीवरच भावना ओळखता यायला हव्यात आणि नकारात्मक भावनांचं ओझं दूर करता यायला हवं. नाही तर हे ओझं साठत राहतं. सकारात्मक रसायनांच्या मदतीने मनावरचं नकारात्मक मळभ बाजूला होतं तेव्हाच आयुष्यातला आनंद दिसायला लागतो. आपलं काय हरवलं होतं ते जाणवतं. आपल्या सर्वाना आनंदी व्हायची संधी मिळायला हवी. दु:खाच्या गडद सावलीला बाजूला करण्याची संधी मिळायला हवी. शेवटी नैराश्याकडे दुर्लक्ष करून आपण कणखर होणार नाही आहोत, तर नैराश्यावर मात करून होणार आहोत. तर जे लोक मेंदूशी छानपैकी मैत्री करतात, ते भयानक संकटांशी दोन हात करून बाहेर येतात.

contact@shrutipanse.com