ओझोन वायू हा ऑक्सिजनचे तीन अणू असलेला अपरूप आहे. या वायूचे सर्वात जास्त प्रमाण पृथ्वीपासून सरासरी १५ ते ३५ किमी उंचीवर स्थितांबरमध्ये आढळते. सूर्याकडून येणाऱ्या घातक अतिनील किरणांपासून ओझोन सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. विसाव्या शतकात वातानुकूलन यंत्र, शीतपेटी, कीटकनाशक (मिथाइल ब्रोमाइड) व दैनंदिन जीवनात वापरले जाणारे विविध स्प्रे यांमुळे क्लोरोफ्लुरोकार्बन या रसायनाचा अनियंत्रित वापर होऊ लागला. १९७४ साली शेरवूड रोलॅण्ड व मारिओ मोलिना यांच्या संशोधनातून क्लोरोफ्लुरोकार्बनमुळे पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोन थराची क्षती होत आहे असे सिद्ध झाले. नंतर काही वर्षांत अनेक संशोधकांनी ओझोन थर व अतिनील किरण यांचा अभ्यास करून जगाच्या निदर्शनास आणून दिले की, ओझोन थर नष्ट झाल्यास अतिनील किरण पृथ्वीपर्यंत पोहोचून त्वचेचा कर्करोग, दृष्टीसंबंधी विकार (अंधत्व) वाढीस लागतील. १९८५ साली अंटार्टिकावरील ओझोन होलचे अस्तित्व कळले. या साऱ्याची दखल घेत संयुक्त राष्ट्रांनी १९८५ साली व्हिएन्ना येथे जागतिक परिषद भरवून सर्व राष्ट्रांनी सहकार्यातून ओझोन थराची दुरुस्ती करण्याचे मान्य केले.

यानंतर १६ सप्टेंबर १९८७ रोजी माँट्रियल करारावर ३० हून अधिक राष्ट्रांमध्ये एकमत झाले व ओझोन दुरुस्तीसाठी ठोस पावले उचलण्याची नियमावली जाहीर झाली. ओझोनची क्षती होण्यास कारणीभूत असलेल्या क्लोरोफ्लुरोकार्बन आणि अन्य रासायनिक द्रव्यांवर पूर्णपणे निर्बंध जाहीर झाले. या कराराअंतर्गत एक निधी उभारला गेला. या निधीचा वापर १४६ विकसनशील देशांमध्ये या कराराप्रमाणे घातक रसायनांवर बंदी आणणे आणि नवे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी होतो.

आज १६ सप्टेंबर. माँट्रियल येथील ऐतिहासिक करार या दिवशी झाला म्हणून ओझोन संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी १९९४ साली १६ सप्टेंबर रोजी ‘जागतिक ओझोन दिन’ साजरा करण्याचे ठरले. दरवर्षी हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिनाचे संकल्पसूत्र आहे- ‘जीवनासाठी ओझोन’! रसायनांवरील निर्बंधांमुळे ओझोन थर दुरुस्त होत आहे आणि २०५० पर्यंत १९८० पूर्वी होता त्या पातळीवर येईल. माँट्रियल करारात ३५ वर्षांच्या कालखंडात सहा दुरुस्त्या केल्या गेल्या. संपूर्ण जग एकत्र येऊन प्रथमच इतक्या यशस्वीपणे काम केल्याची साक्ष माँट्रियल करार आहे. ओझोन केवळ आपल्या जीवनासाठीच नव्हे, तर आपल्या भावी पिढय़ांसाठी सुरक्षित ठेवणे आपले परमकर्तव्य आहे.

– डॉ. सुधा मोघे-सोमणी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org