डॉ. यश वेलणकर

माणूस कोणत्याही समस्येवर निर्णय घेतो, नियोजन करतो, काही आठवतो त्या वेळी विचार करीत असतो. असा विचार रोज थोडा वेळ करायला हवा. पण असा जाणीवपूर्वक विचार करीत नसतो, त्या वेळीही मनात विचार येत असतात. विचार करणे आणि विचार येणे याची सीमारेषा धूसर असते. म्हणजे मनात एखादा विचार येतो आणि आपण त्यावर कधी विचार करू लागतो हेच समजत नाही. सजगतेच्या सरावाने हे भान वाढते. त्यासाठी दिवसभरात अधूनमधून आपले लक्ष कुठे आहे, याकडे लक्ष द्यायचे आणि या क्षणी मी विचार करतो आहे की मनात विचार येत आहेत, याची नोंद करायची. विचार करत असू तर- विचार करण्याची गरज आहे का, असा प्रश्न स्वत:लाच विचारायचा. तशी गरज असेल तर पाच मिनिटे वेळ काढून विचार करायला बसायचे आणि जो विचार केला असेल, नियोजन केले असेल तो फोन किंवा वहीत नोंदवून ठेवायचा. आत्ता विचार करायला वेळ नसेल वा गरज नसेल, तर जे काही काम करीत आहोत त्यावर एकाग्र होण्याचा प्रयत्न करायचा. असे करताना मनात विचार येतील. पण त्यात गुंतून जाऊन आपण विचार करू लागत नाही ना, हे पाहायचे. मनात येणाऱ्या विचारांच्या प्रवाहात वाहून जाऊ नये यासाठी आपले लक्ष श्वासावर किंवा शरीरात जे जाणवते आहे त्यावर आणत राहायचे.

प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून होडीला नांगर असतो; श्वास वा संवेदनांची जाणीव हा असा विचारांच्या प्रवाहातील नांगर आहे. तो वापरला म्हणजे मनात येणाऱ्या विचारांकडे आपण तटस्थपणे पाहू शकतो. या प्रवाहातील बरेचसे विचार जुनेच असतात. काही नवीन विचार असले तरी ते भूतकाळ किंवा आपण जे नियंत्रित करू शकत नाही त्याचे असतात. अशा  विचारांना महत्त्व द्यायचे नाही. त्या विचारांना भावनांचा रंग असेल, तर त्यामुळे शरीरात काय होते ते उत्सुकतेने पाहायचे. असे करताना एखादा नवीन विचार उपयोगी असू शकतो, ती एखादी वेगळी कल्पना असू शकते. त्या विचाराला महत्त्व द्यायचे, पकडून ठेवायचे. शक्य असेल तर तो विचार लिहून ठेवायचा किंवा पुन:पुन्हा तो विचार करायचा. मात्र हे सारे शक्य होण्यासाठी रोज किमान दहा मिनिटे साक्षीध्यानाचा सराव करायला हवा.

yashwel@gmail.com