गेले काही महिने मूलद्रव्यांचा अभ्यास करता करता आपण अनेक मूलद्रव्यांबद्दल कधी मनोरंजक तर कधी आश्चर्यजनक माहिती मिळवली. पृथ्वीच्या पाठीवर आढळणाऱ्या आणि आजपर्यंत शोधल्या गेलेल्या शंभर-सव्वाशे मूलद्रव्यांची अत्यंत शिस्तबद्ध अशी मांडणी आवर्तसारणीमध्ये केली गेली आहे. या आवर्तसारणीप्रमाणे मूलद्रव्यांचे साधारणपणे चार गट पडतात.

२ – गट, स्र् – गट, – गट आणि ऋ – गट हे ते चार गट! आजपासून आपण आवर्तसारणीच्या पायथ्याशी असलेल्या ऋ – गटाकडे वळणार आहोत. या गटातही दोन उपगट आहेत. पहिला गट आहे अणुक्रमांक ५८ ते ७१ चा!

या गटाचा प्रमुख मात्र आहे अणुक्रमांक ५७ असलेलं मूलद्रव्य! ५७ व्या मूलद्रव्याचं नाव आहे लॅन्थॅनम! आणि त्याच्या पाठीला पाठ लावून येणाऱ्या पुढच्या १४ मूलद्रव्यांना म्हणतात लॅन्थॅनाइड्स. त्यामुळेच हा पंधरा जणांचा गट म्हणजे ‘लॅन्थॅनम’चं कुटुंबच आहे जणू! कारण एखाद्या कुटुंबातल्या सर्व सदस्यांच्या स्वभावात किंवा वागणुकीत बराच सारखेपणा आढळतो. अनेक सवयी सारख्या असतात. बऱ्याचदा चेहऱ्यामोहऱ्यातही साधम्र्य असतं. असंच काहीसं या १५ मूलद्रव्यांच्या बाबतीत आहे. आणि जशी कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती, कुटुंबातल्या इतरांशी साधम्र्य असलं तरी कुठल्या ना कुठल्या बाबतीत आपला स्वत:चा असा वेगळेपणा दाखवत असते; तीच बाब या १५ ही मूलद्रव्यांच्या बाबतीत आहे. तेव्हा आजपासून काही दिवस आपण ही पंधरा मंडळी कशी सारखी आणि कशी वेगळी आहेत, ते बघणार आहोत. त्यांच्या एकमेकांशी असलेल्या जवळीकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणीही लक्षात घेणार आहोत.

त्यातही या गटांना आंतरसंक्रामक मूलद्रव्य आणि ‘रेअर अथ्र्स’ म्हणजेच ‘दुर्मीळ मृदा’ मूलद्रव्य असंही म्हटलं जातं. त्यातलं आंतरसंक्रामक हे नामकरण त्यांना त्यांच्यात असलेल्या इलेक्ट्रॉन मांडणीमुळे पडलं असलं आणि ते अगदी सार्थ असलं तरी रेअर अथ्र्स हे नाव मात्र जरा वेगळ्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे.

– डॉ. मानसी राजाध्यक्ष

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org