News Flash

कुतूहल: मत्स्यसंवर्धनासाठी तलाव

मत्स्यसंवर्धन करण्यापूर्वी संवर्धन तलावाचे बांधकाम करताना मत्स्यसंवर्धन तज्ञांची मदत घेणे योग्य ठरते.

| September 14, 2013 01:01 am

कुतूहल: मत्स्यसंवर्धनासाठी तलाव

मत्स्यसंवर्धन करण्यापूर्वी संवर्धन तलावाचे बांधकाम करताना मत्स्यसंवर्धन तज्ञांची मदत घेणे योग्य ठरते.
 उपलब्ध असलेल्या जागेनुसार तलावाचे आकारमान व मांडणी, पाणी पुरवठा व निवारा इत्यादी बाबींचा नकाशा मत्स्यसंवर्धन तज्ञांच्या मदतीने बनवला जातो. त्यानंतर जेसीबी किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने योग्य त्या आकारमानाचे तलाव बांधले जातात. तलावाचे बांध बळकट असावेत. त्याची वरील रुंदी किमान एक ते दोन मीटर असावी. बांधावरती गवत लावलेले असेल तर ते मातीस घट्ट पकडून ठेवते. त्यामुळे पाणी कमी प्रमाणात झिरपते. बांधातून पाणी झिरपत असेल तर ते यंत्राच्या सहाय्याने दाबून घ्यावेत. पाणी बाहेर काढण्यासाठी व आत घेण्यासाठी बांधास दरवाजे असावेत. दोन दरवाजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत असावेत. पाणी बाहेर काढण्याचा दरवाजा तलावाच्या खोल बाजूस असावा., जेणेकरून तलावातील सर्व पाणी सहजरीत्या बाहेर पडू शकेल व तलाव लवकर रिकामा करता येईल.
मत्स्यपालनासाठी तलावांचे विविध प्रकार व आकार असतात. त्यात प्रामुख्याने १. नर्सरी तलाव २. रेअिरग तलाव ३. संचयन तलाव यांचा समावेश होतो.
१. नर्सरी तलाव (संगोपन तलाव): प्रजननापासून मिळालेले मत्स्यजिऱ्यांचे (सुमारे ८ मिमी) मत्स्यबीजांपर्यंत (१२ ते २५ मिमी) संगोपन करण्यासाठी लहान लहान आकारांच्या तळ्यांची आवश्यकता असते. या तळ्यांमध्ये मत्स्यजिरे २०-३० मिमी आकाराचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करायचे असते. हे तलाव ०.०१ ते ०.०४ हेक्टर असतात. तलावाची खोली साधारणत: एक ते दीड मीटपर्यंत असते.
२. रेअिरग तलाव : रेअिरग तलावामध्ये मत्स्यजिरे अर्धबोटुकली अथवा बोटुकली आकारापर्यंत वाढवतात. हे तलाव आकाराने नर्सरी तलावांपेक्षा मोठे (०.०४ ते ०.१ हेक्टर) असतात. तलावांची खोली साधारणत: दीड मीटपर्यंत असते.
३. संचयन तलाव : या तलावांमध्ये बोटुकलीपासून बाजारात विक्रीयोग्य मासळी होईपर्यंत संवर्धन केले जाते. हे तलाव आकाराने ०.५ ते २ हेक्टर आकाराचे असतात. त्यांची खोली दोन ते अडीच मीटर असते. तलावाचा आकार आयताकृती असावा, म्हणजे मासे पकडण्यास सोपे जाते.
वॉर अँड पीस: घोरणे – एक वाढती समस्या
घोरणे ही तक्रार घेऊन येणाऱ्या स्त्री-पुरुषांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत आहे. हे खूप घोरतात, त्यामुळे माझी झोप उडते, मला यांच्या घोरण्याचा कंटाळा आलाय, अशी बाईची नवऱ्याबद्दल तक्रार. याउलट काही नवऱ्यांची बायकोबद्दल वेगळ्या शब्दात, स्वतच  घोरतेय हे तिला कळत नाही.. अशी!
मला माझे लहानपण आठवते. पाच भावंडांत मी मोठा, वडिलांचा लाडका. त्यांच्याबरोबर झोपायचो. वडील जोरजोरात घोरायचे. पण त्यांच्या घोरण्यामुळे माझ्या झोपेत व्यत्यय आलेला आठवत नाही. वडील उंच, धिप्पाड, सकाळी भरपूर व्यायाम करणारे, दिवसभर खूप कामात व्यग्र असणारे, एवढय़ाच माझ्या त्यांच्या घोरण्याबद्दलच्या आठवणी आहेत.
काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील फॅमिली लाइफबद्दल एक चमत्कारिक वृत्त- घोरण्याबद्दल, माझ्या  वाचनात आले. अमेरिकेत नवरा-बायकोंना  घटस्फोट मिळवणे फारच सोपे आहे. ती किंवा तो घोरतो,  माझे स्वास्थ्य जाते, माझी झोप उडते, दिवसा काम करता येत नाही, एवढय़ाच मुद्दय़ावर फॅमिली कोर्टात सहजपणे घटस्फोट मिळवता येतो. आपणा भारतीयांचे नशीब चांगले आहे. असा झटपट घटस्फोट आपल्याकडे मिळणार नाही.
घोरणाऱ्या मंडळींचा सकाळपासून रात्रौपर्यंतचा दिनक्रम मी बारकाईने विचारतो. जेवणाच्या सवयी, आहारपदार्थ, व्यसने, कामाचे स्वरूप इत्यादींचा मागोवा  घेतो. घोरणारी बहुसंख्य मंडळी बैठे काम करणारी, पचनशक्तीच्या बाहेर व भूक नसतानाही भरपूर खाणारी असतात. व्यायामाचा अभाव असतो. सायंकाळी जेवण कमी करण्याची तयारी नसते. रात्री जेवणानंतर लगेचच झोपण्याची सवय. घोरण्याची तक्रार दूर करण्याकरिता सायंकाळी लवकर, कमी जेवण, जेवणानंतर किमान वीस मिनिटे फिरून येणे आवश्यक. आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि, चंद्रप्रभा, त्रिफळागुग्गुळ, जेवणानंतर अभयारिष्ट, रात्रौ गंधर्वहरितकी, उकडलेल्या भाज्या, सुंठमिश्रित गरम पाणी आणि मिळवा घोरण्यावर छुटकारा!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी..     आवाज आणि घाणीची दुनिया
मला दोन वाईट सवयी आहेत. लवकर झोपणे आणि लवकर उठणे.
त्याची कारणे आहेत.
हल्ली देशात घडलेल्या घटना चित्रवाणीवर नुसत्या सांगत नाहीत, तर त्यावर तडकाफडकी  परिसंवाद घडवून आणतात. त्यात मध्ये बसतो वार्ताकन करणारा मुख्य आणि मग स्टुडिओत देशपरदेशचे लोक पडद्यावर टपकतात. पहिल्यापहिल्यांदा गंमत वाटली, पण मग लक्षात आले, की या व्यक्तींची मते घटना घडायच्या आधीच ठरलेली असतात आणि तो वार्ताकन करणारा या दोघांमध्ये कोंबडय़ांची झुंज लावून देतो आणि मजा बघतो. सगळेच शिरा ताणून ओरडतात. निष्पन्न काहीच होत नाही. म्हणून लवकर झोपतो.
 लवकर उठावे लागते, कारण सात-साडेसातला घराबाहेर पडावे लागते. शाळेत असताना आणि नातेवाईकांकडून सूर्यनमस्काराचे, योगासनाचे बाळकडू पाजले गेल्यामुळे ते करावेच लागते, पण त्या वेळीही शांतता नसते. मशिदीवर लाऊडस्पीकर लावून बांग देतात. सणवार असोत वा नसोत, कोणी तरी नुसतेच भजन म्हणत नाहीत, ते सगळ्यांना ऐकू येईल अशी व्यवस्था करतात. हल्ली हल्ली ‘हम भी कम नही’ या धर्तीवर चर्चच्या घंटाही वाजवायला सुरुवात झाली आहे. रामप्रहरी सगळे जण आपापल्या रामाची जाहिरात करण्याचा हा प्रकार आहे.
धर्माचे मला नवल वाटते. एकाला पूर्व पवित्र, दुसऱ्याला पश्चिम परमोच्च. मध्ये एका आंतरधर्मीय विवाहाला गेलो तिथे सकाळी शाकाहारी पंगत आणि दुपारी बोकड कापला. सकाळी अग्नीभोवती फेरे मारत मंगलाष्टके रेकत रेकत म्हणण्यात आली. संध्याकाळी अग्निकुंड भुईसपाट करून निकाह झाला. चर्चमध्ये लग्न लागले तर मात्र खुद्द देवासमोरच आणाभाका होतात, तिथेही आवाज घुमेपर्यंत संगीत वाजवतात. आपल्याकडचे सणवार म्हणजे घाण, गोंधळ आणि आवाज असेच समीकरण आहे. सर्वच धर्माना हे लागू आहे.
आमच्या पलीकडच्या दग्र्याच्या उत्सवाच्या वेळची श्रद्धा, गर्दी, घाण, भिकारी, पदपथावर शिजवण्यात येणारे अन्न आणि एकंदरच बकालपणा यांचे मीलन होते. बुधवारच्या माहिम चर्चच्या नोव्हेनाच्या प्रार्थनेच्या दिवशीची फेरीवाल्यांची झुंबड आणि एकेका फुटासाठी त्यांची जीवघेणी स्पर्धा आणि यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यात वाजणारे गाडय़ांचे हॉर्न्‍स जीव घेतात.
गणपतीच्या दहा दिवसांत प्रजेचे उत्साहाचे उधाण आणि कानठळ्या बसवणारे संगीत आणि नंतर अनेक दिवस रस्त्यावर पडलेली घाण आणि कचरा.. या सगळ्याला मला वाटते देवच जबाबदार आहे..
.. माणूस नसणार, कारण सगळे देवावर सोपवून तो मोकळा झाला आहे.
रविन मायदेव थत्ते –    rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत        १४ सप्टेंबर
१८६७ > वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक, अभ्यासू धर्मप्रचारक व ग्रंथसंपादक विष्णुबुवा जोग यांचा जन्म. ‘तुकोबारायांच्या अभंगाच्या सार्थ गाथा’, ‘सार्थ अमृतानुभव’, ‘हरिपाठ- सार्थ’ तसेच वारकरी संप्रदायाची भजन-मालिका यांना जोग यांची पुस्तकरूप दिले.
१९०१ > लोकसाहित्य आणि पंतकवींचे अभ्यासक नारायण गोविंद नांदापूरकर यांचा जन्म. मुक्तेश्वर आणि मोरोपंत यांच्या महाभारत-काव्यांचा तौलनिक अभ्यास करून त्यांनी ‘मयूर-मुक्तांची भारते’ हा ग्रंथ लिहिला. टागोरांच्या गार्डनरचा (फुलारी) तसेच खलील जिब्रानच्या टिअर्स अँड लाफ्टर्सचा (हसू आणि आसू) अनुवाद त्यांनी केला. ‘मायबोलीची कहाणी’ लिहून मराठी व तिच्या बोलींचा इतिहास मांडला, तर तीन महत्त्वाचे स्त्री-गीतसंग्रह संपादित केले.
१९२८ > पंचवीसहून अधिक आवृत्त्या निघालेले ‘अन्नपूर्णा’ हे पाककलाविषयक पुस्तक लिहिणाऱ्या मंगला अच्युत बर्वे यांचा जन्म. ‘चायनीज पदार्थ’, ‘मांसाहारी इच्छाभोजन’ ही त्यांची अन्य पुस्तके. ‘मुलांच्या अंगी मुलींचे गुण बाणवा’ हा त्यांचा लेखही उल्लेखनीय आहे.
१९३२ > मरालिका, दोलाचल,इंद्रधनु आदी   कथासंग्रहांच्या लेखिका सुधा मुकुंद नरवणे यांचा जन्म.
संजय वझरेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2013 1:01 am

Web Title: curiosity farm ponds for fish conservation
टॅग : Curiosity
Next Stories
1 कुतूहल: मत्स्यशेती
2 कुतूहल – मत्स्य व्यवसायातून रोजगार -२
3 कुतूहल – मत्स्य व्यवसाय
Just Now!
X