विद्याधर वालावलकर
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ , office@mavipamumbai.org

जगभरात सर्वमान्य झालेले ‘कॅलेंडर इयर’ म्हणून इंग्रजी नववर्षांचे स्वागत मध्यरात्री फटाके वाजून करण्याची प्रथाही देशोदेशी आहे. परंतु महाराष्ट्रात, शालिवाहन शकानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या नववर्षांचे स्वागत हे मध्यरात्रीऐवजी पहाटेच्या वेळी, दीपप्रज्वलन आणि आरती करून, गुढी उभारून तसेच घरी गोडाधोडाचे जेवण करून साजरे केले जाते.

गुढीपाडवा हा सण अनेक राज्यांत विविध नावांनी साजरा होतो. महाराष्ट्रातील अनेक शहरांत गेल्या दोन दशकांपासून या सणाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आले. आदल्या दिवशी रात्री दीपोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळ्या, सुशोभीकरण आणि पाडव्याच्या सकाळी विविध शहरांमध्ये नववर्ष स्वागतयात्रा अशा स्वरूपात हा सण सार्वजनिकरीत्या मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला.

सार्वजनिकरीत्या साजरा होणाऱ्या कार्यक्रमात, विशेषत: सणांच्या सादरीकरणात आपण जाणीवपूर्वक बदल केला तर तो लोकमानस बदलण्याचे चांगले माध्यम ठरू शकतो. गुढीपाडवा म्हणजे नववर्ष म्हणजे फटाके हे समीकरण आता राहिले नाही. आता अनेक शहरांमध्ये या कार्यक्रमात, १०० ते १४० डेसिबेल इतका आवाज करणारे तसेच आवाज न करता हवेत धूर सोडून प्रदूषण करणारे ‘शोभेचे फटाके’ वाजत नाहीत. काही वर्षांपूर्वी या फटाक्यांना पर्याय म्हणून हवेत उडवले जाणारे कागदी कंदीलही (पेपर लँटर्न) लोकांचे आकर्षण बनले होते!  परंतु ते धोकादायक असल्याने त्यावर बंदी आल्यामुळे ठाणे शहरात आता सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि आरतीने (गंगेची तसेच शिवछत्रपतींची आरती) दीपोत्सव साजरा होतो.

पर्यावरण, जलसंवर्धन, रेन वॉटर हार्वेिस्टग, झाडे लावा झाडे जगवा,  प्लास्टिकचा राक्षस, वायुप्रदूषण, पर्यावरण शिक्षण, स्वच्छता, कंपोिस्टग अँड व्हर्मिकंपोिस्टग अशा पर्यावरणस्नेही विषयांवर या यात्रेमधील सहभागी चित्ररथाची संख्या सर्वात जास्त असते. सहभागी संस्थांपकी अनेक संस्था सामाजिक आणि पर्यावरणीय संदेश देण्यासाठी या यात्रेचे माध्यम उपयोगात आणतात.

याच यात्रेत भरमसाट संख्येने मोठय़ा आवाजात वाजणाऱ्या ढोलपथकांचा समावेश गेली काही वर्षे झाला होता. परंतु आता या भरमसाट आवाजालाही आपोआप मर्यादा आल्या आहेत. उत्साह म्हणून अत्यंत थोडा वेळ आणि निर्देशित ठिकाणीच ढोलवादन होते. ढोल पथकातील संख्येवरही सजग नागरिकांच्या तक्रारींनंतर आता मर्यादा आल्या आहेत. एकूणच ध्वनिप्रदूषणाच्या कायद्याचा समाजास उपयोग करून आता सर्वत्र आवाजाच्या मर्यादा मान्य झाल्या आहेत. आता ढोलांच्या आवाजावर (डेसिबेल-मापकावरील मापन १००च्या पुढे गेल्यास) कारवाईही होते.

पर्यावरणाच्या आवश्यकता म्हणून यात्रेत पेट्रोल वा डिझेलवर चालणारी वाहने असू नयेत, अशी चर्चा आता होऊ लागली आहे. कदाचित आणखी काही वर्षांनी निघणारी यात्रा पूर्णत: विजेरी वाहनांवर, किंवा कोणत्याही स्वयंचलित वाहनाशिवाय फक्त हजारो लोकांच्या पायांनी चालेल.