डॉ. श्रुती पानसे contact@shrutipanse.com

व्यायाम ही फक्त मुलांनी आणि तरुणांनीच करायची गोष्ट राहिलेली नाही. कित्येक आजीआजोबा सकाळी बागांमध्ये व्यायाम करायला जमतात, ही फार छान गोष्ट आहे. वयानुसार स्मरणशक्ती कमी होत जाते. काल-परवा घडलेलं आठवत नाही, पण जुन्या कित्येक वर्षांपूर्वीच्या घटना मात्र ताज्या असतात. कारण या घटना दीर्घकालीन स्मृतिकेंद्रात गेलेल्या असतात. त्या आठवत असतात. पण परिणाम होत असतो तो अल्पकालीन स्मृतींवर. केवळ मुलांनीच नाही तर मोठय़ांनीही स्मरणशक्तीसाठी व्यायाम करावा. नियमित व्यायामामुळे हिप्पोकॅम्पसमधल्या पेशींना चालना मिळते. हिप्पोकॅम्पस हे स्मरणशक्तीचं केंद्र आहे.  व्यायामामुळे हे केंद्र छान, तरतरीत राहतं. ‘विसरण्या’वर औषधं घेण्यापेक्षा हा उपाय नक्कीच चांगला आणि बिनखर्चाचा आहे.

व्यायामामुळे एकूणच स्नायूंना चालना मिळते. स्नायू आधिक कार्यक्षम होतात. शरीरस्वास्थ्यावर याचा खूपच चांगला परिणाम होतो. मुख्य म्हणजे रक्ताभिसरण चांगलं होतं. हे फायदे तर आहेतच. पण मेंदूसाठीचा एक फायदा म्हणजे नियमित व्यायाम केल्याने मुलांची स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे शिकण्याची क्षमताही वाढते. या क्षमतेत जवळपास १५ ते २० टक्क्यांनी वाढ होऊ  शकते.

व्यायाम करताना असं बघा की, प्रत्येक स्नायूची हालचाल व्हायला हवी. रोज योगासनं करायला वेळ काढा. योगासनांमध्ये श्वासोच्छ्वासाचा विचार केलेला आहे. शिस्तबद्ध श्वासोच्छ्वास मेंदूला ऑक्सिजन पुरवतो. योगासनांमध्ये शरीराला विविध शास्त्रीय पद्धतीने वळवलं जातं. प्रत्येक अवयवाला कसा व्यायाम घडेल हे लक्षात घेऊन प्रत्येक आसन ठरवलेलं आहे. यातून सूक्ष्म स्नायूंचा विकास होतो. शरीर अंतर्बाह्य निरोगी होतं. तसंच मनही कणखर, खंबीर होतं.

योगासनांमध्ये सांगितलेल्या आसनांच्या विविध पद्धती रोजही वापरता येण्यासारख्या आहेत. अगदी कसं बसावं, कसं उभं राहावं यासाठी आपण आसनांचा विचार करू शकतो. अगदी लहान वयापासून योगासनांची सवय लावली तर शरीर आणि मन दोन्हीसाठी ते चांगलंच आहे.

बैठी कामं करणाऱ्यांनी ऑफिसच्या आवारात, परिसरात चालायला जायला हवं. लिफ्टऐवजी जिन्याने चढा-उतरायला हवं. शक्य असेल तर पोहण्यासारखे व्यायाम सुरू करायला हवेत. सध्या शहरांमधल्या काही पूल्सवर पाण्यातले व्यायाम घेतले जातात. रोज व्यायाम करणाऱ्या माणसाची रोगप्रतिकारक्षमता अत्यंत चांगली असते. त्यामुळे तो माणूस आजारी पडत नाही. समजा काही झालंच तर लवकर बराही होतो.