आतापर्यंतच्या मूलद्रव्यांच्या प्रवासात बऱ्याचदा उल्लेख झालेले शास्त्रज्ञ म्हणजे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ सर हम्फ्री डेव्ही. विद्युत अपघटन पद्धतीचा वापर करून त्यांनी अनेक मूलद्रव्ये अलग केली. त्यांचा जन्म इंग्लडमधील पेंझेस (कॉर्नवॉल) येथे झाला. गळ वापरून मासेमारी करणे आणि कविता करणे हे त्यांचे दोन छंद त्यांनी आयुष्यभर जोपासले. १७९४मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर एका शल्यचिकित्सक आणि औषध-विक्रेता जे. बी. बोर्लास यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम सुरू केले. पुढे १७९७मध्ये त्यांनी रसायनशास्त्राचा अभ्यास सुरू केला. १७९८मध्ये न्यूमॅटिकी इन्स्टिटय़ूटमध्ये ते रुजू झाले. आणि इथेच त्यांनी निरनिराळ्या वायूंच्या श्वसनाने होणाऱ्या परिणामांसंबंधी प्रयोग केले. या प्रयोगांपैकीच एक हर्षवायूचा प्रयोग होता. त्यांच्या रसायनशास्त्राच्या संशोधनास यापुढे प्रारंभ झाला. बोरॉन, सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम ही मूलद्रव्ये त्यांच्या क्षारांपासून विलग केली. क्लोरिन, आयोडिन, बेरिअम यांच्या शोधाचे श्रेय हेही हम्फ्री डेव्ही यांनाच जाते आणि कार्ल शील यांनी शोधलेल्या क्लोरिनचे नामकरणही त्यांचेच!

१७९९ मध्ये व्होल्टाने अखंड विद्युतप्रवाह देणाऱ्या पहिल्या बॅटरीचा (व्होल्टाइक पाइल) शोध लावला. त्यानंतर संशोधन क्षेत्रात शास्त्रज्ञांचं लक्ष विद्युत संशोधनाकडे वळलं. साधनसामग्रीयुक्त प्रयोगशाळा आणि विद्युत अपघटनाचा अभ्यास या दोन्ही गोष्टी असलेले हम्फ्री डेव्हीही याला अपवाद नव्हते. विद्युत रसायनशास्त्रात संशोधन करताना रासायनिक अभिक्रियेमुळे विद्युतप्रवाह निर्माण होतो असे त्यांना आढळले.

कुतूहल : लुई पाश्चर
महान शास्त्रज्ञ मेरी क्युरी
विज्ञानाला नवे वळण देणारे निकोलस कोपर्निकस
हृदयाची धडकन् ओळखणारे विल्यम हार्वे

हम्फ्री डेव्ही यांच्या नावाने ओळखले जाणारे महत्त्वाचे संशोधन म्हणजे ‘डेव्हीचा रक्षक दीप’ कोळशाच्या खाणीत निसर्गत: मिथेन व हायड्रोकार्बनसारखे ज्वालाग्राही वायू आढळतात. खाणींमध्ये प्रकाशासाठी वापरण्यात येणाऱ्या दिव्यांच्या ज्योतीमुळे मिथेनसारखे वायू पेट घेऊन स्फोट होत असे. खाण कामगारांच्या सुरक्षेसाठी या समस्येवर उपाय म्हणून दिव्याच्या ज्योतीवर लोखंडी जाळी असणारा ‘रक्षक दीप’ हम्फ्री डेव्ही यांनी १८१५ साली शोधला.

मायकेल फॅरेडे हा माझा महत्त्वाचा शोध आहे असे हम्फ्री डेव्ही मजेने म्हणत असत. झाले असे की, नायट्रोजन ट्रायक्लोराइडने प्रयोगशाळेत झालेल्या अपघाताने डेव्ही जखमी झाले. त्यांनी मायकेल फॅरेडेला नोंदी ठेवण्यासाठी साहाय्यक म्हणून नेमले. हाच मायकेल फॅरेडे पुढे प्रसिद्ध संशोधक झाला.

 अनघा वक्टे , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org