News Flash

बिट्स आणि बाइट्स

बिट (bit) म्हणजे बायनरी डिजिट, हे माहितीसाठी वापरण्यात येणारं सर्वात छोटं एकक.

 

अमुक एमबीची मेमरी, तमुक जीबीची हार्डडिस्क ही संगणकात माहिती साठवण्याची क्षमता मोजण्याची पद्धत आता आपल्या आयुष्यात चांगल्यापैकी रुळलेली आहे. तिच्यामागची कहाणी आज पाहू या.

संगणकातल्या चिप्सवरच्या इलेक्ट्रॉनिकस किट्सना विद्युत ऊर्जा पुरवल्यावर ती ऑन (१) किंवा ऑफ (०) अशा दोन स्थिती दाखवतात. या दोन स्थितींवर आधारित ही मोजमापाची पद्धत आहे. दशमान पद्धतीत ०, १, २, ३, ४, ५, ६, ७, ८ व ९ असे दहा अंक असतात, तर या पद्धतीत ० आणि १ हे दोनच अंक (डिजिट्स) असल्याने तिला द्विमान (बायनरी) पद्धत म्हटलं जातं. या पद्धतीत बिट (bit) म्हणजे बायनरी डिजिट, हे माहितीसाठी वापरण्यात येणारं सर्वात छोटं एकक.

फक्त दोनच अंक वापरून पुढच्या मोठय़ा संख्या कशा दाखवायच्या? तर त्यासाठी अंकांचं स्थानमूल्य वापरलं जातं. दशमान पद्धतीत १५ लिहिताना दशमस्थानाच्या एकचं मूल्य १० असतं, तर १५७ मध्ये शतमस्थानाच्या एकचं मूल्य १०० असतं. त्याच धर्तीवर द्विमान पद्धतीतही स्थानमूल्य १, २, ४, ८, १६ असं उजवीकडून डावीकडे जाताना दुपटीने वाढत जातं. या पद्धतीत ५ साठी १०१ म्हणजे ४+०+१, किंवा १९ साठी १००११ म्हणजे ६+०+०+२+१.

सुरुवातीच्या संगणकांच्या चिप्स या ८-बिट्स माहितीवर काम करणाऱ्या होत्या. त्यामुळे ८ बिट्सचं मापन रूढ होऊ लागलं आणि त्याचं बाइट् (Byte) म्हणजे बायनरी टर्म असं नामकरण करण्यात आलं. नंतर १६-बिट्स, ३२-बिट्स, आणि आता ६४-बिट्स माहितीवर काम करणारे संगणक आलेले आहेत. अंकांसोबत प्रत्येक अक्षरासाठीसुद्धा विशिष्ट बाइट असं प्रमाणीकरण (स्टँडर्डायझेशन) करण्यात आलेलं आहे.

संगणकांची स्मृतिक्षमता वाढत गेली, तशी किलोबाइट (केबी) = १०२४ बाइट्स, मेगाबाइट (एमबी) = १०२४ किलोबाइट्स, गिगाबाइट (जीबी) = १०२४ मेगाबाइट्स अशी पुढची मापनंप्रचलित होत गेली. किलो, मेगा अशी गुणकं वापरली असली, तरी ती दहाच्या पटीत नसून द्विमान पद्धतीशी संबंधित आहेत.

बिट आणि बाइट यामध्ये गोंधळ उडू नये, म्हणून बाइट शब्दात मुद्दाम ८ वापरला होता. आजही बिट आणि बाइटमध्ये गडबड होऊ नये यासाठी म्हणजे बिट आणि इ म्हणजे बाइट असा संकेत वापरला जातो.

–  मेघश्री दळवी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

अमरकान्त – हिंदी (२००९ विभागून)

भारतीय साहित्यातील उत्कृष्ट योगदानासाठी हिंदीतील श्रेष्ठ आणि यशस्वी कथालेखक अमरकान्त यांना २००९ चा ज्ञानपीठ पुरस्कार श्रीलाल शुक्ल यांच्यासह विभागून प्रदान करण्यात आला.

प्रेमचंद यांच्यानंतर यथार्थ, वास्तववादी कथालेखन करणारे ते कथालेखक होते. तसेच हिंदीतील नवकथा आंदोलनातील मोहन राकेश , कमलेश्वर, निर्मल वर्मा इ. अनेक शिलेदारांबरोबर अमरकान्त यांचाही समावेश आहे. कथेइतकंच त्यांचे कादंबरीलेखनही लक्षणीय आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्य़ातील नगाराजवळील भगमलपूर गावी १ जुलै १९२५ रोजी अमरकान्त यांचा जन्म झाला. अलाहाबाद विश्वविद्यालयात बी.ए. झाल्यानंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या संपर्कात आल्यावर ते त्यात सहभागी झाले. सुरुवातीला ते गजला आणि लोकगीते गात असत. जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता, आदर होता.

अमरकान्त यांच्या साहित्यजीवनाची सुरुवात पत्रकारितेने झाली. अनेक पत्रिकांचे त्यांनी संपादन केले. १९५५ मध्ये लिहिलेल्या डिप्टी कलेक्टर’ या कथेने त्यांना प्रसिद्धी मिळाली. अमरकान्त अतिशय संकोची स्वभावाचे होते. आपल्या हक्कांबाबतही ते संकोची होते. बिकट परिस्थितीतही प्रकाशकांकडे पैसे मागण्यात त्यांना संकोच वाटत असे. अकरा कादंबऱ्या, दोन संस्मरण आणि काही बालसाहित्य प्रकाशित झाले असूनही एक यथार्थ कथाकार म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत.

स्वातंत्र्योत्तर काळातील कनिष्ठ मध्यमवर्ग आणि मध्यमवर्गीय जीवन, त्यांचा जगण्यासाठीचा मोठा संघर्ष, धडपड, तरीही असलेला जीवनाप्रती आशावाद हे सारं त्यांच्या कथांत ठायीठायी दिसतं. साहित्यजगतातील ते अशा शैलीचे कथाकार आहेत की जे आयुष्यातील कठीण परिस्थितीतही झुंज देत इतरांना लढण्याची प्रेरणा देतात व त्यांच्या मनात आशावाद निर्माण करून आयुषयातील ओझं हलकं करण्यास मदत करतात.

अशा या आधुनिक हिंदी कथासाहित्यातील यशस्वी लेखकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:43 am

Web Title: information on bits and bytes
Next Stories
1 संगणक पडद्याची मापे
2 मेगाहर्ट्झ ते पेटाफ्लॉप्स
3 एडमंड फॉस्टिन बिर्नाकी
Just Now!
X