अनेक गणिती खेळांचा उपयोग बौद्धिक क्षमता विकसनात केला जातो. अशाच मेंदूला चालना देणाऱ्या खेळाचे नाव आहे- सोमा घन (सोमा क्यूब)! बहुतांश लहान मुलांच्या खेळण्यांत हा गणिती खेळ सदस्य असतो. उत्तम गणितज्ञ, कवी आणि लेखक असणाऱ्या पिएट हेन यांनी सोमा घनाचा शोध लावला, तो १९३३ साली. हेन यांना ‘क्वाण्टम मेकॅनिक्स’वर प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ हायझेनबर्ग यांचे भाषण ऐकताना हा शोध लागला असे म्हटले जाते. सोमा घन हे टॅनग्राम या कोडय़ाचे तीन मितींतले थोडे सुधारित रूप मानले जाते. ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या कादंबरीत नैराश्यग्रस्तांना व्यसन लावणारे काल्पनिक द्रव ‘सोमा’ म्हणून उल्लेखले आहे. त्यावरूनच सर्वानाच ओढ लावणाऱ्या या खेळाचे नाव ‘सोमा घन’ ठेवले गेले.

सोमा घन या खेळात सात तुकडे समाविष्ट असतात. यांपैकी सहा तुकडे हे प्रत्येकी चार छोटय़ा छोटय़ा घनांनी (क्युबलेट्स) व एक तुकडा तीन छोटय़ा घनांनी तयार केलेला असतो. अशा प्रकारे एकूण २७ घन असणाऱ्या या गणिती खेळात सात तुकडय़ांची रचना ३७३७३ अशा घनात करणे हे एक महत्त्वाचे कोडे मानले जाते. वेगवेगळ्या २४० पद्धतींनी सात तुकडय़ांपासून घन तयार करणे शक्य आहे. आत्तापर्यंत सर्वात जलद गतीने सोमा घनामधील सात तुकडय़ांपासून घन तयार करण्याचा विक्रम २.९३ सेकंद असून तो कृष्णम् राजू गदिराजू या भारतीय व्यक्तीच्या नावावर आहे.

सोमा घनातील सात तुकडय़ांपासून घनाकृतीची रचनाच नव्हे, तर त्याबरोबरच साप, खुर्ची यांसारखे आकार तयार करण्याचा खेळही खेळता येतो. ‘सी++’ या संगणकीय भाषेच्या मदतीने सोमा घन सोडविण्यासाठीचा कार्यसंच (प्रोग्रॅम) तयार केला गेला आहे. एवढेच नव्हे, तर संगणकावर आभासी सोमा घन सोडविण्यासाठी तयार आज्ञावली (सॉफ्टवेअर्स) उपलब्ध आहेत.

या खेळाचा विविक्त गणित (डिस्क्रीट मॅथेमॅटिक्स) आणि पूर्णाक गणिती प्रायोजन (इंटीजर प्रोग्रामिंग)  यांच्याशी संबंध आहे. हा खेळ मनोरंजक तर आहेच, परंतु त्याचबरोबर मानसिक विचारप्रक्रियेला चालना देणारा आहे. त्यामुळे पाच ते दहा वर्षांच्या मुलांना बौद्धिक प्रगतीसाठी हा खेळ खेळण्यास सुचवले जाते. एकदा हा खेळ खेळायला हातात घेतला, की तो पूर्ण सोडवेपर्यंत भान हरपून जाते; यातच त्या खेळातले मनावर पकड घेणारे आकर्षण दडलेले आहे!

– मुक्ताई मिलिंद देसाई

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org