06 July 2020

News Flash

कुतूहल – विडय़ाचा लाल रंग

विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विडय़ामुळं लाल झालेलं तोंड.

| April 23, 2014 01:01 am

विडे अनेक प्रकारे आवडीनुसार बनवले जातात, खाल्ले  जातात आणि खिलवलेही जातात. पण लक्षात राहातं, ते विडय़ामुळं लाल झालेलं तोंड.
फक्त नागवेलीचं पान खाल्लं तर लाल रंग येत नाही.  सुपारी, चुना, तंबाखू यांमुळेही तो येत नाही. मग विडय़ाला लाल रंग येतो, तो कशामुळे? लाल रंग येण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो तो कात. काताशिवाय विडा रंगत नाही. विडय़ामध्ये अनेक प्रकार असले तरी त्यामध्ये चुना-सुपारीबरोबरच काताचे स्थान अबाधित आहे. खैराच्या झाडापासून कात तयार करतात.  खैराचे लाकूड (जिवंत झाडाचेच) पाण्यात उकळवून त्यावर अनेक प्रक्रिया करून कात घनरूपात मिळवतात. त्याची जाडसर पेस्ट विडय़ात वापरतात. खैराच्या झाडामध्ये एल अ‍ॅपिकॅटेचिन, रॅसेमिक अ‍ॅतककॅटेचिन व कॅटेच्युटनिक आम्ल ही संयुगे असतात. झाडात प्रामुख्याने एल अ‍ॅपिकॅटेचिन हे संयुग असलेले ‘खीरसळ’ हे स्फटिकी चूर्ण आढळते.
कात, चुना, सुपारी इ. घातलेला विडा चांगला कुटला, एकजिनसी केला तर त्याचा विटकरी, हिरवट रस दिसतो. तरीही डोळ्यात भरणारा लालभडक रंग येत नाही. परंतु हेच मिश्रण तोंडात चावले की विडय़ाचा रंग खुलतो. म्हणजेच खुलवणारा लाल रंग येण्यासाठी आपल्या तोंडातील लाळेचाही महत्त्वाचा सहभाग आहे. खरं तर कातातील कॅटेच्युटनिक आम्ल (C13H12O5) ) निष्क्रिय असतं, पण कॅटेच्युटनिक आम्ल गरम पाण्याबरोबर तसंच लाळेबरोबर क्रियाशील होतं. सुपारीमुळे लाळ सुटते. चुन्यामुळे किंचित उष्णता तयार होते. कातातील टॅनिंनवर लाळेतील विकरांचा परिणाम होऊन फ्लोबॅफिन हे भडक लाल रंगद्रव्य तयार होतं. ज्यामुळे तोंड लाल दिसतं. फ्लोबॅफिन हा फिनॉलिक पदार्थ पाण्यात विरघळत नाही पण अल्कोहोलमध्ये विरघळतो.  
विडा तोंडाची दरुगधी घालवतो. पानातील गंधयुक्त बाष्पनशील तेलामुळे तोंडाची दरुगधी जाते. परंतु पान खाणाऱ्या व्यक्तींच्या तोंडाला एक प्रकारची दरुगधी येते. ती पान खाल्ल्यानंतर तोंड स्वच्छ न केल्यामुळे. शिवाय विडय़ाचे प्रमाणाबाहेर सेवन हे आरोग्यास घातकच ठरते. पान खाल्ल्यावर इथे तिथे थुंकून त्याचा इतरांच्या आरोग्यावर हानीकारक परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेतलीच पाहिजे.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई ss  office@mavipamumbai.org

मनमोराचा पिसारा – प्रश्नोपनिषदातील प्रश्न
सभोवतालच्या सृष्टीत हे सारं आलं कुठून? निसर्गातल्या या प्रचंड उलाढाली झाल्या कशा? त्या घडविणारा कोण? त्या घडल्या कशासाठी आणि केव्हापासून? या अवाढव्य, अनाकलनीय जगड्व्याळ पसाऱ्यातला ‘मी माणूस’ हा सूक्ष्म प्राणी का जन्माला आला? या वैश्विक अवकाशात एक व्यक्ती म्हणून माझं स्थान काय आहे? असतं का? असावं का? आणि इथे मांडलेले हे सर्व प्रश्न अर्थपूर्ण आहेत, की ही केवळ माणसानं केलेली स्वत:ची फसवणूक आहे?
असे थेट प्रश्न सोडवायला सुरुवात करून फार तर दोन-पाच हजार र्वष झालेली आहेत. या सर्व प्रश्नांना उत्तरं मिळालेली तर नाहीच, पण उत्तरांपेक्षा, उत्तर शोधण्याच्या प्रक्रिया मात्र आता सुनिश्चित झालेल्या आहेत. अ‍ॅरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिससारख्या तत्त्ववेत्त्यापासून उपनिषदापर्यंत सर्व तीक्ष्ण बुद्धिवंतांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. सर्व प्रकारच्या दार्शनिकांचा अभ्यास करताना वारंवार जाणवतं की, ‘ज्ञाननिर्मिती केल्याशिवाय सृष्टीचा उलगडा होणं केवळ अशक्य आहे.’
पाश्चात्त्यांच्या (भारताच्या पश्चिमेला) भूमिकेतून माणसाची बुद्धी-तर्ककुतर्क, चर्चा करण्याची क्षमता आणि पंचेंद्रियांनी जाणवणारी परिसराची माहिती यांना प्राधान्य दिलं. जवळपास, त्याच पद्धतीने उपनिषदाने ज्ञानोपासनेसाठी बुद्धी आणि ज्ञानेंद्रियांद्वारे निर्माण होणारी माहिती याला महत्त्व दिलं.
प्रश्नोपनिषदामध्ये ज्ञाननिर्मिती आणि संग्रहणाच्या या मुद्दय़ांवर अतिशय मूलगामी चर्चा केलेली आहे. पंचमहाभूते आणि पंचेंद्रियांकडून ग्रहण केलेली माहिती निर्माण होण्यामागे ही प्रत्यक्ष संवेदनाग्रहण ही पहिली पायरी आणि त्याचा अर्थ लावणारी बुद्धी यांचा ताळमेळ कसा जुळून येतो याचं या श्लोकात विवरण केलेले आहे.
तस्मै स होवाच-
आकाशो ह वा एष देवो
वायुरग्निराप: पृथिवी वाङ्मनश्चक्षु: श्रोत्रं च।
ते प्रकाश्याभिवदन्ति वयमेतद्
बाणमवष्टभ्य विधारयाम: ।। २।।
भार्गवाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर गुरू म्हणाले, पंचमहाभूते (देवस्वरूप) आणि पंचेंद्रियांच्या संयोगाने हा मानवदेह संश्लिष्ट (तयार) होतो. पृथ्वी, आप, वायू, तेज आणि आकाश आणि वाणी, श्रुती, दृष्टी आणि मन या सर्वानी मिळून मानव शरीर निर्माण होतं. त्यामध्ये कोणताही घटक कमीअधिक महत्त्वाचा नाही. या मूलभूत घटकांच्या साहाय्याने मानवी जीवन साकार होते.
याचा अर्थ असा की, ज्ञानग्रहणासाठी सभोवतालातील पंचमहाभूते आणि माणसाची ज्ञानेंद्रिये यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद नसून ते घटक एकत्र येणं हाच एक प्रकारे निसर्गनियम आहे.
दृष्टीशिवाय सृष्टी दिसणार नाही, नादलहरीशिवाय श्रवणकेंद्र (कान) कार्यान्वित होत नाहीत, मनातल्या अनुभवांच्या आकलनाखेरीज शब्द उच्चारला जात नाही. प्रश्नोपनिषदाने ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेची समस्या अशा रीतीने सोडविली आणि सर्वसमावेशक, होलिस्टिक विचार मांडला.
हाच सर्वसमावेशक, र्सवकष विचार भारतीय विचारपरंपरेचा प्रमुख गाभा ठरला.
उपनिषदामध्ये मूलभूत विषयांचा अत्यंत नि:स्पृहपणे परामर्श घेतला आहे याचा इथे प्रत्यय येतो.
डॉ.राजेंद्र बर्वे –  drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व – संस्कृतीचा अहंकार हा महाराष्ट्राचा शाप!
‘‘आम्हाला महाराष्ट्राचा भयंकर अभिमान आहे, पण हा दुरभिमान आहे. कारण मागे वळून पाहून गतकालच्या साम्राज्याच्या आठवणीवर तो आधारलेला आहे. महाराष्ट्राचे घोडे अटकेपार गेले, आमच्या भाऊसाहेबांनी दिल्लीचे तक्त फोडले या उद्गारांनी आमच्या हृदयात आनंदाच्या उर्मी उसळू लागतात..
.. महाराष्ट्राचा खोटा अभिमान आमच्या अंगात भिनला आहे. अभिमानासाठी मनुष्य वाटेल तोही त्याग करील. महाराष्ट्राला इतिहास आहे. इतर प्रांतांना नाही हाच तो अहंकार! आमच्या महाराष्ट्राने राज्य मिळविले-आणि घालविलेसुद्धा! स्वातंत्र्यानंतर एक महापुरुष म्हणाले, सारा हिंदुस्थान आता महाराष्ट्राच्या तलवारीकडे पहात आहे. या अहंकारातच महाराष्ट्राचा नाश आहे.’’
 महाराष्ट्राच्या वृथा अहंकारापायी त्यांच्या संस्कृीचा कसा ऱ्हास होत आहे याविषयी स. ज. भागवत पुढे म्हणतात-
‘‘महाराष्ट्राचा प्रश्न म्हणजे संस्कृतीच्या अहंकाराचा प्रश्न.. ब्राह्मण, मराठे, महार यांचे एकीकरण कसे करावे हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे. हे एकीकरण सेवेने व सत्यानेच होईल. भारतासाठी महाराष्ट्र झटेल तर त्याचे वैभव वाढेल. भारतावर सर्वस्व गाजविणाऱ्या भावनेने महाराष्ट्राचा अध:पात होईल. समाजाचे पुढारीपण नुसत्या शास्त्राने होत नाही, त्यासाठी सर्व समाजाचे आकलन झाले पाहिजे व समाजाच्या हृदयाशी आपले हृदय भिडले पाहिजे..
.. समाजाच्या कल्याणासाठी सर्व ज्ञानी लोकांनी सेवा करावी. आपले पुढारीपण लादण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर द्वेषभावना वाढेल व महाराष्ट्र पिचत राहील. मोठेपणाच्या कल्पना सोडल्या तरच महाराष्ट्राचा विकास होईल. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा संकोच होत चालला आहे. हा संकोच फोडून महाराष्ट्र विकासाच्या मार्गाला येणार की नाही आणि महाराष्ट्राच्या, भारताच्या व तद्द्वारा जगाच्या कल्याणासाठी तो झटणार की नाही, यावरच महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2014 1:01 am

Web Title: paan red color
टॅग Navneet,Navnit
Next Stories
1 कुतूहल – पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?
2 कुतूहल: शिजवलेल्या पालेभाजीचा रंग
3 कुतूहल: पिकलेल्या पानांचा हिरवा रंग
Just Now!
X