साधारणत एक हजार वर्षांपूर्वी भारतीय प्रदेशात योद्धे म्हणून प्रवेश केलेली पठाण जमात त्यांच्या युद्धकुशलता आणि लढवय्येपणाबद्दल विख्यात आहे. त्याचप्रमाणे भारतीय इस्लामी समाजात सय्यद, शेख, मुघल आणि पठाण या चार वंशाच्या घराण्यांना माननीय, आदरणीय समजले जाते. आदरणीय या अर्थी त्यांना ‘अशरफ’ किंवा ‘शराफा’ हा बहुमानाचा खिताब दिला जातो.

राजपूत हासुद्धा भारतीयां एक लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो. इस्लाममध्ये धर्मातर केलेल्या अनेक राजपूतांनी इस्लाम कबूल केल्यावर आपल्या नावांपुढेही पठाणांचे ‘खान’ हे प्रतिष्ठेचे उपनाम लावले, एवढेच नाही तर पठाणांच्या आफ्रिदी, युसुफझाई वगैरे प्रतिष्ठित कबिल्यांची नावे स्वतला जोडली. ‘खान’ या शब्दाचा अर्थ राजा असाही होतो. त्यामुळे खान हे उपनाव लावणाऱ्यांची संख्या भारतात मोठी असली तरी सगळे खान हे मूळच्या पश्तून किंवा पठाणांचे पुढचे वंशज असतीलच असे नाही.

गुजराती पठाणांच्या पुढच्या वंशजांनी गुजरातमध्ये मोठय़ा प्रदेशावर आपला अंमल स्थापन करून शासन केले. १४७२ साली गुजरातचा सुलतान मेहमूदशाह प्रथम याने जुनागढ घेऊन ते गुजरात सल्तनतमध्ये सामील केले. त्याने चंपानेरचे नाव बदलून महमुदाबाद असे केले. त्याने अल्पावधीतच पावागढ ऊर्फ चंपानेर आणि जुनागढ येथील दोन किल्ले घेतल्यामुळे तो बेगढा किंवा बेगडा या नावाने प्रसिद्ध झाला. चंपानेर हे मेहमूद बेगडाच्या राजधानीचे ठिकाण होते. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी जुनागढजवळच्या दीववर आक्रमण केले. त्यावेळी महमूद बेगडाच्या एका तुर्की सेनाधिकाऱ्याने त्यांना थोपविण्यासाठी जुनागढ जवळच्या किल्ल्यात पंधरा फूट लांबीची एक प्रचंड तोफ बसवली होती. ही तोफ आजही सुरक्षित आहे.

पठाणांच्या प्रतिष्ठेच्या बारा घराण्यां सामा घराण्याच्या या मेहमूद बेगडाने ५४ वर्षे सत्ता राखली. चंपानेर येथे मेहमुदाने बांधलेली १७२ स्तंभांची आणि ३० मीटर उंचीच्या दोन मिनारांची, तसेच दगडात कोरलेल्या अत्यंत नाजूक जाळीची जामा मशीद हे त्याकाळच्या संपन्न, उन्नत, स्थापत्यकलेचा नमुना समजला जातो.

सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com