आपल्या सभोवती असलेल्या हवेत प्राणवायू, नत्रवायू, कर्ब-द्वि-प्राणील वायू, पाण्याची वाफ असे घटक असतात. परंतु जी हवा दिसतच नाही त्यात एकाहून जास्त वायू असावेत ही शंका तरी कशी आली? विज्ञानाच्या इतिहासाकडे नजर टाकली तर असे लक्षात येते की हवेच्या घटकांची माहिती हवेच्या अभ्यासातून झालीच नाही. ती इतर प्रयोगातून झाली आहे.

जोसेफ ब्लॅक हे शास्त्रज्ञ जखमेवर लावायच्या क्षारांचा अभ्यास करीत होते. त्यांनी हे क्षार तापविले तेव्हा त्यांना एक वायू मिळाला.  हा वायू म्हणजे एक प्रकारची हवाच आहे असे त्यांना वाटले. परंतु ती जळण्याच्या क्रियेला विरोध करणारी हवा आहे हे त्यांच्या लक्षात आले. ही हवा क्षारात दडलेली असते म्हणून त्यांनी तिला स्थिर हवा  (फिक्स्ड एअर) असे नाव दिले.

काही वर्षांनंतर हेन्री कॅव्हेंडिश या ब्रिटिश शास्त्रज्ञाने धातूवर आम्ल टाकून एक वायू मिळविला. या वायूचे वैशिष्ट्य असे की त़ो हलका असतो आणि स्वत: जळतो. कॅव्हेंडिशना वाटले की त्यांनी जळणारी हवा मिळविली आहे.

इंग्लंडच्याच जोसेफ प्रिस्टले नावाच्या शास्त्रज्ञाने पार्याच्या ऑक्साइडला तापवून एक वायू मिळविला. या वायूचे गुणधर्म ब्लॅकने मिळविलेल्या वायूच्या विरुद्ध होते.  हा वायू ज्वलनाला मदत करीत असून आम्लदेखील निर्माण करतो असे प्रिस्टलेच्या लक्षात आले. त्यांनी मिळविलेल्या वायूत उंदीर सोडला असता तो उड्या मारू लागला. म्हणून आपण सजीवांना स्फूर्ती देणारी हवा शोधली असे त्यांनी जाहीर केले.

विज्ञान जगतात वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे वायू शोधले जात होते. प्रत्येकजण आपण नवीन हवा शोधल्याचे जाहीर करीत असे. यावर सांगोपांग विचार करून असे ठरविण्यात आले की त्या मंडळींनी नवीन हवा शोधली नसून हवेतील एक एक घटक मिळविला होता. संशोधकांनी त्यांनी शोधलेल्या वायूचे जे गुणधर्म सांगितले ते हवेतदेखील आढळतात. हे लक्षात आल्यावर हवेच्या घटकांची माहिती मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. वर सांगितलेला स्थिर घटक आणि ज्वलनाला मदत करणारा घटक हवेत आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते अनुक्रमे कर्ब-द्वि-प्राणील वायू आणि प्राणवायू होत. अधिक प्रयोग केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की हवेत जळणारा घटक जरी नसला तरी एक निष्क्रिय घटक आहे, त्याचे नाव नत्रवायू. आज आपल्याला हवेत असलेल्या सर्व घटकांची अचूक माहिती मिळाली आहे.

 – डॉ. सुधाकर आगरकर मराठी विज्ञान परिषद

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ईमेल : office@mavipa.org