३० एप्रिल १७७७ रोजी जर्मनीतल्या ब्रुन्सविक येथे कार्ल फ्रेडरिक गाऊस (गॉस) यांचा जन्म झाला. बालपणापासूनच गाऊस यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक दिसून आली होती. भाषा, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांमध्ये रुची असणाऱ्या गाऊसना गणिताविषयी विशेष प्रेम होते. गणिताला ते ‘विज्ञानाची राणी’ असे संबोधत. गाऊस एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढले. त्यांच्या आईच्या प्रोत्साहनाने आणि ब्रुन्सविक राज्यातील सरदार फर्दिनांद यांच्या आर्थिक साहाय्याने त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी गाऊस विद्यापीठात रुजू झाले व काही काळातच त्यांनी आपल्या गणिती प्रज्ञेचे प्रमाण द्यायला सुरुवात केली. त्यापैकीच एक म्हणजे, सात बाजूंची बहुभुजाकृती केवळ पट्टी व कंपास वापरून रचण्याची त्यांची पद्धत, जी खूप प्रसिद्ध झाली.

विद्यापीठात शिकत असलेल्या गाऊस यांनी एकरूपता (कॉन्ग्रुअन्स) व त्याची प्रमेये, लघुतम वर्गाची पद्धत (मेथड ऑफ लीस्ट स्क्वेअर्स) यांसारख्या संकल्पनांची ठोस घडण केली. यांपैकी लघुतम वर्गाच्या पद्धतीचे श्रेय फक्त गाऊस यांनाच नव्हे, तर फ्रेंच गणिती लेगेन्द्रे यांनादेखील जाते. त्याचप्रमाणे, या कालावधीत गाऊस यांनी अर्थबद्ध केलेला सांख्यिकीतील ‘गाऊसिअन लॉ ऑफ नॉर्मल डिस्ट्रिब्युशन’ आजदेखील अनेक क्षेत्रांत वापरला जातो. १७९९ साली गाऊस यांनी पीएच.डी. पदवी मिळवली. त्यासाठीच्या प्रबंधात कल्पित संख्यांचे ठोस असे वर्णन सर्वप्रथम गाऊस यांनी मांडले. मुळात ‘कल्पित संख्या (इमॅजिनरी नंबर)’ ही संज्ञा गाऊस यांनीच दिली. पुढे ‘डिस्क्विसिथिओन अरिथमेटिका (अ‍ॅरिथमेटिकल इन्व्हेस्टिगेशन्स)’ हे लॅटिन भाषेत लिहिलेले (सन १८०१) त्यांचे पहिले मोठे पुस्तक जगभर गाजले.

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

गणिती गाऊस वैज्ञानिकदेखील होते. हेलिओट्रोप यंत्र, बायफिलर मॅग्नेटोमीटर (किंवा गाऊसमीटर) यांसारख्या उपकरणांचा शोध त्यांनी लावला. तसेच १८३३ सालचा, गाऊस-वेबर तार (टेलिग्राफ) हा सर्वात महत्त्वाचा शोध. संदेशवहनासाठी तारेच्या प्रथम काही शोधयंत्रणांपैकी ही एक समजली जाते. सन १८२१ ते १८४८ या काळात गाऊस यांचा संबंध भूसर्वेक्षणांशी निगडित काही समस्यांशी आला. त्याकरिता युक्लिडेतर भूमितीचा अभ्यास त्यांनी सुरू केला. असा समज आहे की, विकलक (डिफरन्शियल) भूमितीचे उगमस्थान हेच. त्यातील त्यांचे महत्त्वाचे योगदान म्हणजे वक्राचे प्राचली प्रतिरूपण (पॅरॅमेट्रिक रिप्रेझेंटेशन ऑफ ए कव्र्ह). गाऊस यांचे इतर काही महत्त्वाचे योगदान म्हणजे, कल्पित संख्या व त्यांचे सिद्धान्त, सूर्यमालेतील ग्रहगोलांच्या गतींचे सिद्धान्त, अतिगुणोत्तरीय श्रेणीचा (हायपर जिऑमेट्रिक सीरिज) अभ्यास, गॉशियन एलिमिनेशन पद्धत, फंडामेण्टल थिअरम ऑफ अल्जिब्रा, गॉशियन वितरण, इत्यादी. गणितावर सखोल व व्यापक प्रभाव टाकणारा गणितज्ञांचा हा राजकुमार अजरामर आहे!

– प्रा. सई जोशी

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org