आपला देश जैवविविधतेने नटलेला आहे. या जैवविविधतेतील वन्यजीव मानवी जीवनाचाही अविभाज्य घटक आहेत. या वन्यजीवांच्या परस्परसंबंधांविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी माहिती व्हावी, त्या दृष्टीने जनजागृती व्हावी, यासाठी १९५४ सालापासून दरवर्षी भारत सरकारच्या ‘नॅशनल बोर्ड ऑफ वाइल्डलाइफ’तर्फे २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर हा आठवडा ‘भारतीय वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो. २०२० हे या सप्ताहाचे ६६ वे वर्ष आहे. २०११ सालापासून हा सप्ताह दरवर्षी एका विशिष्ट संकल्पसूत्रासह साजरा केला जातो. उदाहरणार्थ, ‘वन्यजीव आणि पाणी- २०१४’, ‘लिव्हिंग विथ वाइल्डलाइफ- २०१५’ इत्यादी. त्याप्रमाणे यंदा या सप्ताहाचे संकल्पसूत्र आहे- ‘सस्टेनिंग ऑल लाइफ ऑन अर्थ’, म्हणजेच ‘पृथ्वीवरील सर्व सजीव टिकवणे’! प्रत्येक सजीव हा त्याच्या सभोवतालच्या एक किंवा अनेक सजीवांवर अवलंबून असतो. वाघ, सिंह, बिबटय़ा यांसारखे मार्जार कुळातील भक्षक जंगलातील अन्नसाखळीच्या सर्वोच्च स्थानी आहेत. या अन्नसाखळीतील खालच्या पातळीवरील एखादी प्रजाती जरी नष्ट झाली, तरी या भक्षक प्रजातींवर त्याचे विपरीत परिणाम होतात.

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी संपूर्ण भारतात अनेक अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने उभारण्यात आली. तरीसुद्धा मानवी अतिक्रमणाच्या वाढत्या रेटय़ामुळे आजही वन्यजीवांसमोर भरपूर आव्हाने आणि समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यांच्या अधिवासांचा ऱ्हास, अवैध शिकार, विकासकामे या व अशा अनेक कारणांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आहे. मानव-वन्यजीव संघर्ष कधी कधी गंभीर रूप धारण करतो. वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनासाठी अनेक कायदे आपल्याकडे आहेतही, पण प्रश्न त्यांच्या काटेकोर अंमलबजावणीचा आहे. त्या दृष्टीनेही जनजागृतीची गरज आहे.

भारतीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने संपूर्ण भारतात जनजागृतीसाठी अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. काही स्वयंसेवी संस्था तसेच सरकारतर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यांद्वारे वन्यजीवांचे महत्त्व तरुण पिढीच्या ध्यानात यावे आणि ते वन्यजीव संवर्धनासाठी अधिक सजग व्हावेत, हा प्रयत्न असतो.

यंदाच्या राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या संकल्पसूत्रानुसार, जर पृथ्वीवरील सर्व जीव टिकवायचे असतील तर अथक प्रयत्नांची गरज आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या भारतीय वन्यजीव सप्ताहानिमित्त, पृथ्वीवर राहायचा जेवढा हक्क आपला आहे तेवढाच तो वन्यजीवांचादेखील आहे एवढे जरी आपण ध्यानात ठेवले तरी खूप महत्त्वाचे ठरेल.

– सुरभी वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org