scorecardresearch

कुतूहल : शैवाल आणि पिण्याचे पाणी

शैवाल आणि पाणी हे परस्परपूरक असून जिथे जिथे पाणी असेल किंवा ओलसरपणा असेल तिथे शैवाल निर्माण होते.

कुतूहल : शैवाल आणि पिण्याचे पाणी

सुरेश ना. पाटणकर

शैवाल आणि पाणी हे परस्परपूरक असून जिथे जिथे पाणी असेल किंवा ओलसरपणा असेल तिथे शैवाल निर्माण होते. पिण्याचे पाणी साठवल्यावर त्यातही शैवाल निर्माण होणारच. यासाठी पाणीपुरवठा करताना जल विभागाला विरंजक पावडर किंवा इतर काही उपाययोजना करणे अनिवार्य ठरते. शैवाल झाले तर पाण्याच्या प्रवाहांमध्येसुद्धा त्याची अडचण निर्माण होते. नागरिकांना पाणीपुरवठा करताना पाण्यात शैवाल होऊ नये किंवा शैवाल नाहीसे व्हावे यासाठी वेगवेगळय़ा उपाययोजना केल्या जातात. त्याच्यातील मुख्य म्हणजे कॉपर सल्फेट, विरंजक पावडर, क्लोरिन यांचा वापर साधारणपणे एक मिलिग्रम प्रति लिटर, एवढय़ा मात्रेत केला जातो. त्याशिवाय इतर काही पद्धतींमध्ये पाण्यात रसायने टाकून अल्ट्रासोनिक तंत्रानेसुद्धा शैवाल नाहीसे केले जाते. सर्वात मुख्य उपाय म्हणजे कुठल्याही तलावात किंवा साचलेल्या पाण्यात फॉस्फरस किंवा नायट्रोजन जाणार नाही याची काळजी घेतल्यास शैवालाचे प्रमाण कमी होऊ शकते. त्याशिवाय ऑक्सिजनेशन केल्यास त्याचा परिणाम शैवाल न होण्यामध्ये होतो. पिण्याच्या पाण्यामध्ये शैवाल वाढल्यास अतिसार (डायरिया), त्वचेचे आणि घशाचे विकार होऊ शकतात. शैवाल होऊ नये म्हणून उपयोजना करताना तलावातील माशांना इजा होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते.

इमारतीवरील पाण्याच्या टाकीत शैवाल होऊ नये म्हणून पाणी सतत बदलत राहणे, टाकीच्या भिंती नियमित साफ करणे आणि शक्यतो टाकीवर आच्छादन करणे या गोष्टी आवश्यक आहेत. मोठय़ा तलावांमध्ये असे आच्छादन शक्य होत नाही, पण नैसर्गिकरीत्या ते तयार होऊ शकते. तलावांमध्ये वॉटर लिली, कमळ यांसारख्या तरंगणाऱ्या वनस्पतींचे आच्छादन असल्यास सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोहोचत नाही आणि पाण्यात शैवाल अतिशय कमी वाढते. नील हरित शैवाल हे अमोनिया, नायट्रेटचा स्रोत आहे, जे पाण्यात सहज विरघळते. आवश्यकतेपेक्षा जास्त नायट्रेट विरघळलेले पाणी आरोग्यास अपायकारक असते. दीर्घकाळ पाणी साठवलेल्या उघडय़ावरील जलस्रोतांच्या तुलनेत, जेथे पाण्याचा उपसा जास्त आणि नियमित असतो तिथे शैवालाचे प्रमाण नगण्य असते. 

सर्वात उत्तम म्हणजे जल विभागाने पुरवलेले पाणी गाळून, उकळून घेतले तर शैवाल किंवा एकंदरीतच जिवाणू नसण्याचा संभव अधिक असतो. शैवाल होऊ नये म्हणून जल विभाग काळजी घेत असतोच, तरीही टाक्यांमध्ये शैवालाची समस्या निर्माण होऊ शकते, म्हणूनच टाकीची नियमित सफाई करणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व नवनीत ( Navneet ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या