‘केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था’ म्हणजेच ‘सीआयएफई’ ही मत्स्यविज्ञानातील उच्च शिक्षण देणारी व संशोधन करणारी भारतातील प्रमुख राष्ट्रीय संस्था असून ती मुंबईत अंधेरीत स्थित आहे. मत्स्योत्पादनात जागतिक पातळीवर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. अन्नसुरक्षेच्या दृष्टीनेही मत्स्यउत्पादन महत्त्वाचा घटक असल्याने मत्स्य व्यवसायाकडे केवळ पारंपरिक दृष्टिकोनातून न पाहता, त्याचे व्यवस्थापन करून उत्पादन वाढवण्याकरिता मत्स्यविज्ञानाचे शास्त्रीय शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, हे डॉ. दत्तात्रय वामन बाळ यांनी ओळखले. त्यांच्या विशेष प्रयत्नांनी १९६१ साली ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत स्थापन करण्यात आली आणि १९८९ साली या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. संस्थेची प्रादेशिक उपकेंद्रे रोहतक, कोलकाता, काकीनाडा, मध्य प्रदेशातील पावरखेडा आणि बिहारमधील मोतिहारी येथे आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल : प्रथिनयुक्त सागरी खाद्य शेवंड

या संस्थेत संशोधन व प्रशिक्षणाची उत्तम सोय असून येथे भारतातील सर्व राज्यांतून तसेच आशिया, आफ्रिका येथील प्रदेशांतूनही अनेक विद्यार्थी येतात. येथील प्रयोगशाळा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून अद्ययावत संगणक केंद्र, ग्रंथालय, सभागृह (कॉन्फरन्स हॉल) आणि विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोयही आहे. संशोधनाद्वारे निर्माण झालेले तंत्रज्ञान स्थानिक मच्छीमार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम विस्तार विभागातर्फे करण्यात येते. अलीकडेच, सीआयएफईने विकसित केलेले टायगर कोळंबीचे इनलॅँड म्हणजेच खाडीच्या क्षारपड जमिनीत कोळंबी संवर्धन करण्याचे तंत्रज्ञान व्यापारी तत्त्वावर यशस्वीरीत्या वापरण्यात येत आहे.

मत्स्यपालन, मत्स्यपालन संसाधन व्यवस्थापन, मत्स्यजननशास्त्र आणि जैव तंत्रज्ञान, मत्स्यपोषण आणि खाद्य तंत्रज्ञान, मत्स्यप्रक्रिया तंत्रज्ञान, मत्स्यव्यवसाय अर्थशास्त्र, काढणीपश्चात तंत्रज्ञान, विस्तार यांसारख्या विविध शाखांतील एम. एस्सी. व पीएच.डी. स्तरावरील शिक्षण येथे देण्यात येते. राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाते. आजमितीस एम.एस्सी.चे ९६ व पीएच.डी.चे ६८ विद्यार्थी तिथे प्रशिक्षण घेत संशोधन करत आहेत. याशिवाय व्यावसायिक विकास कार्यक्रम (पीडीपी), उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) आणि कौशल्य विकास कार्यक्रमांचे (एसडीपी) आयोजन, सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण  मत्स्य व्यावसायिक आणि उद्योजक घडवण्यासाठी केले जाते.

या संस्थेत शिक्षण घेतलेल्या अनेक मत्स्यशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी देशात तसेच परदेशात मत्स्य उद्योगाच्या वाढीत आणि मनुष्यबळ विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.

– डॉ. सीमा खोत

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळ : www.mavipa.org