कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने विकसित होण्याबरोबरच दिवसेंदिवस अधिक विवेकी आणि सुज्ञ होत आहे यात शंका नाही. तरीही, आपल्याला अपेक्षित उत्तर किंवा निष्कर्ष मिळवण्यासाठी अजूनही काही मर्यादेपर्यंत मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता आहे. जर प्रणालीला पुरवलेली आणि साठवलेली माहिती सदोष, अपूर्ण किंवा पक्षपाती असेल तर तिचे विश्लेषण अचूक करता येणार नाही. परिणामी निष्कर्षही योग्य निघणार नाहीत. मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता अधिकाधिक अचूक होईपर्यंत काही त्रुटींसहित स्वीकारावी लागेल. असे काही पैलू सोबतच्या आकृतीत दिले आहेत.
हेही वाचा >>> कुतूहल : मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेचे दैनंदिन उपयोजन
कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली ही बहुतेक वेळा त्यात संचयित केलेल्या माहितीपुरतीच बुद्धिमान असते ज्यामुळे अनेकदा मोठ्या समस्या येतात जसे की, भाषांतर समजताना. तुटपुंज्या शब्दकोशामुळे भाषांतर अयोग्य होऊन वाक्य अर्थहीन किंवा विसंगत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणालीला प्रशिक्षण देताना ठरावीक प्रकाराचीच माहिती वापरली असेल तर पूर्वग्रहावरून अनुचित निर्णय मिळू शकतात. उदाहरणार्थ, एकाच पठडीतल्या चेहऱ्यांच्या छायाचित्रांवर प्रशिक्षित प्रणाली, त्याव्यतिरिक्त इतर चेहरे ओळखण्यासाठी असमर्थ ठरेल. आपण आधी केलेल्या खरेदीच्या माहितीवरून आपल्या आवडीच्या वस्तू सुचवणारी मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रणाली आपल्याला उपयुक्त सल्लाही देऊ करते. मात्र अनेकदा त्याचा अतिरेक होतो तसेच चुकीच्या शिफारसी केल्या जातात.
हेही वाचा >>> कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेची मर्यादित क्षमता
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने लष्कराकरिता शक्तिशाली शस्त्रास्त्रे तयार केली जात आहेत. उदाहरणार्थ क्षेपणास्त्राची प्रणाली पूर्वनियोजित असली तरी परिस्थितीनुसार निर्णय घेण्यासाठी लवचीक असली पाहिजे. त्याच वेळी अशा क्षमतांचा हानिकारक उपयोग होऊ नये यासाठी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. प्रणाली तयार करताना आणि प्रशिक्षण देताना मोठ्या प्रमाणावर माहितीचा संचय उपयोगात आणला जातो. त्यातील संवेदनशील आणि वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते.
सध्याच्या काळात मर्यादित कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीची रचना आणि व्यवस्थापन संपूर्णपणे मनुष्याच्या नियंत्रणात आहे. त्याबरोबरच यंत्रांना स्वअध्ययन करण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेला अधिकाधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नामध्ये यंत्र स्वतः प्रणाली तयार करू लागले; तर ते मनुष्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडे जाऊ शकेल अशी शंका वाटते. जेव्हा यंत्र स्वयंअध्ययन करू लागतील तेव्हा मानवी बुद्धिमत्ता तंत्रज्ञानात विलीन होईल. काही तज्ज्ञ अशी शक्यता व्यक्त करतात की दूरदृष्टी ठेवून मनुष्याने कृत्रिम बुद्धिमत्तेशी जुळवून घेतले तर ती मर्यादित न उरता अमर्यादित होईल.
– वैशाली फाटक-काटकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल: office@mavipa.org
संकेतस्थळ: http://www.mavipa.org