24 November 2020

News Flash

आनंदी आनंद चोहीकडे

माणसाला हवा असतो आनंद, परिपूर्ण आणि शुद्ध आनंद, कारण तिथेच सगळ्या इच्छा संपतात.

माणसाला हवा असतो आनंद, परिपूर्ण आणि शुद्ध आनंद, कारण तिथेच सगळ्या इच्छा संपतात. जोपर्यंत इच्छा आहेत, तोवर दु:ख आहे, कारण जिथे इच्छा आहे, तिथे शांती असूच शकत नाही. इच्छा पूर्णपणे संपल्या आहेत अशी अवस्था आनंद घेऊन येते. या आनंदासोबत स्वातंत्र्य आणि मुक्तीही येते, कारण जिथे अपूर्णत्वाची भावना असते, तिथे बंधन आणि अवलंबित्वही असतंच. जिथे कशाचाही अभाव नसतो, तिथे पूर्ण स्वातंत्र्याची शक्यता असते.. स्वातंत्र्यासोबत आनंद येतो आणि आनंद म्हणजे मोक्ष! पूर्ण आनंद आणि अंतिम स्वातंत्र्याची इच्छा प्रत्येकामध्ये सुप्त स्वरूपात असतेच. ती एका बीजाच्या स्वरूपात असते. या बीजामध्ये एक झाड दडलेलं असतं. त्याचप्रमाणे, मानवाच्या अंतिम इच्छेचं समाधान त्याच्या स्वभावातच कुठे तरी दडलेलं असतं. ही एक पूर्णपणे विकसित अवस्था आहे. आनंदी असणं, स्वतंत्र असणं हा आपला स्वभाव आहे. आपला खरा स्वभाव ही एकच गोष्ट सत्य आहे आणि तिला परिपूर्णतेकडे नेलं तर पूर्ण समाधान लाभू शकतं.

आपल्या स्वत:च्या स्वभावाचं समाधान करण्याचा प्रयत्न जो माणूस करत नाही, तो वैभवामुळे सर्व दु:खं दूर होतील या गैरसमजात राहतो; पण भौतिक संपदा कधीही त्याच्या आतील रिक्तता भरून काढू शकत नाही आणि म्हणून, एखादा माणूस जगातील शक्य ते सारं मिळवतो; पण तरीही त्याला काही तरी राहून गेलंय असं वाटत राहतं. त्याचा गाभा रिकामाच राहतो. बुद्ध एकदा म्हणाले होते, ‘‘इच्छेचं समाधान करणं कठीण आहे.’’

माणसाने कितीही यश संपादन केलं, तरी तो कधीच समाधानी नसतो हे काहीसं विचित्र आहे. त्याला आणखी मोठं यश हवंसं वाटतं आणि म्हणून भिकाऱ्याची आणि सम्राटाची गरिबी सारखीच असते. या स्तरावर, त्यामध्ये काहीसुद्धा फरक नसतो.

बाहेरच्या जगात माणसाने काहीही कमावलं, तरी ते अस्थिर आहे. ते हरवू शकतं, कधीही नष्ट होऊ  शकतं आणि अखेरीस मृत्यू सगळ्याचा घास घेतोच. त्यामुळे अशा प्रकारच्या सहजपणे हिरावल्या जाऊ  शकणाऱ्या गोष्टींनी कोणाच्याही हृदयाचं आतून समाधान होत नाही, यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. अशा प्रकारचं वैभव माणसाला कधीही सुरक्षिततेची जाणीव देत नाही, त्याने या वैभवाचा कितीही कष्टाने पाठलाग केला तरी. खरं तर काय घडतं, माणसाला त्याने प्राप्त केलेल्या वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठीही प्रयोजन करावं लागतं.

बाह्य़ सत्ता आणि वैभव यामुळे एखाद्याच्या मनातली काही तरी हवं असल्याची भावना, असुरक्षितता, भीती नाहीशी होत नाही, हे प्रथम स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे. या भावना लपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मवंचना. समृद्धीचा नेहमीच कैफ चढतो; त्यामुळे आयुष्यातलं वास्तव विसरलं जातं आणि अशा प्रकारचा विसराळूपणा हा गरिबीपेक्षा वाईट असतो, कारण या खऱ्याखुऱ्या गरिबीचं निवारण करण्यापासून माणसाला हा विसराळूपणा रोखतो.

दारिद्रय़ हाही एक मादक पदार्थच आहे; तोही आयुष्यातलं वास्तव लपवतो. कोणत्याही भौतिक गोष्टीच्या अभावामुळे दारिद्रय़ येत नाही किंवा दारिद्रय़ म्हणजे श्रीमंती किंवा समृद्धीची कमतरताही नव्हे, कारण एखादा माणूस श्रीमंत आणि प्रभावशाली झाला, तरीही त्याच्या ठायी गरिबी असतेच. ज्यांच्याकडे सर्व काही आहे असं भासतं, त्यांची गरिबी तुम्ही बघू शकत नाही का? तुमच्या मालकीच्या भौतिक गोष्टींमुळे कधी ओझं हलकं झालंय तुमच्यावरचं?

समृद्धी आणि समृद्धीचा भ्रम यांच्यात खूप मोठा फरक आहे. ही बाह्य़ संपत्ती, शक्ती आणि सुरक्षितता या तुमच्या आतमध्ये वसत असलेल्या श्रीमंतीच्या केवळ सावल्या आहेत. तुम्हाला गरिबीची भावना जाणवते ती बाह्य़ जगातील काही तरी साध्य करता आलं नाही म्हणून नव्हे, तर स्वत:पासून पाठ फिरवल्यामुळे आणि म्हणूनच ही भावना बाहेरच्या कशानेही नष्ट होणार नाही, ती आतून काढून टाकायला हवी.

परमानंद हा स्वत्वाचा स्वभाव आहे. हा काही स्वत्वाचा गुण नाही, तर स्वत्वाचं सार आहे. आनंदाचं स्वत्वाशी नातं नाही, तर स्वत्व हाच आनंद आहे. ती एकाच सत्याची दोन नावं आहेत. आम्ही स्वत्व म्हणजे आनंद असं म्हणतो ते काहीशा अनुभवात्मक दृष्टिकोनातून, त्यामुळे तुम्हाला आनंद आणि खरा आनंद यात गल्लत होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. खरा आनंद म्हणजेच स्वत्व. जेव्हा हा आनंद सापडतो, तेव्हा सर्व गोष्टींचा शोध संपतो. फसवा आनंद साध्य झाला, की हा शोध अधिक तीव्र होतो आणि गमावण्याची भीतीही तीव्र होते, असा आनंद मन:शांती ढळून टाकतो. माणसाची तृषा वाढवणारं पाणी हे खरं पाणी नव्हेच. ख्रिस्त म्हणाले होते, ‘‘या, मला तुम्हाला अशा एका विहिरीकडे घेऊन जाऊ  द्या, जिचं पाणी तुमची तहान कायमस्वरूपी भागवेल.’’

आपण सुख आणि आनंद यात कायम गल्लत करत राहतो. सुख ही केवळ एक सावली आहे, आनंदाचं केवळ प्रतिबिंब आहे. मात्र, आनंदाचा हा आभास म्हणजेच आयुष्य आहे या भ्रमात बहुतेक लोक जगतात आणि मग साहजिकच अखेरीस त्यांच्या वाटय़ाला निराशा येते. हे म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब म्हणजेच खरा चंद्र असं समजून तो पकडायचा प्रयत्न करण्यासारखं आहे. तळ्यात पडलेलं चंद्राचं प्रतिबिंब पकडण्यासाठी खोल खोल पाण्यात शिरणारा माणूस खऱ्या चंद्रापासून अधिकाधिक दूर जात असतो. आणि त्याचप्रमाणे, सुखाच्या शोधातली माणसं आनंदापासून अधिकाधिक दूर जात राहतात. हा रस्ता केवळ दु:खाकडे घेऊन जातो. तुम्हाला मी सांगतोय, त्यातलं सत्य लक्षात येतंय का? सुखाच्या पाठीमागे धावलं तर केवळ दु:ख वाटय़ाला येतं हे तुमच्या आयुष्यानेही बघितलं असेलच; पण ते अगदी नैसर्गिक आहे. प्रतिबिंब वरकरणी तंतोतंत मूळ गोष्टीसारखंच भासतं, पण ते वास्तव अजिबात नसतं.

प्रत्येक सुखामध्ये आनंदाचा वायदा असतो, किंबहुना सुख म्हणजे आनंदच असं ही सुखं सांगत असतात – पण सुख ही आनंदाची केवळ सावली आहे. त्यामुळे सुखाला आनंद म्हणून स्वीकारल्याची परिणती अपयशात आणि खेदाच्या भावनेत होते. तुमची सावली धरून मी तुम्हाला कसं पकडू शकेन? आणि तुमची सावली मी अगदी पकडली, तरी ती माझ्या हातात येईल का?

लक्षात ठेवा, प्रतिबिंब हे नेहमी बिंबाच्या विरुद्ध असतं. मी आरशासमोर उभा राहिलो, तर मी प्रत्यक्षात जसा उभा आहे, त्याचा बरोबर उलट माझं प्रतिबिंब दिसेल आणि हे सुखाबाबतही खरं आहे. सुख हे आनंदाचं केवळ प्रतिबिंब आहे. आनंद हा अंत:स्थ गुण आहे, तर सुख हे बाह्य़ प्रदर्शन आहे. सुख केवळ भौतिक जगात अस्तित्वात असते. केवळ आनंदातच कल्याण असतं. सुखाचा शोध सुरू ठेवून बघा आणि मी सांगतोय ते किती खरं आहे हे तुमच्याच लक्षात येईल. सर्व सुखांची अखेर दु:खात होते.

पण काही वेळा जे अखेरीस असतं, तेच सुरुवातीलाही असू शकतं. तुमची दृष्टी तेवढी खोलवर पोहोचू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला जे सुरुवातीला लक्षात यायला हवं ते शेवटी कळतं. एखाद्या घटनेच्या अखेरीस जे समोर आलं, ते सुरुवातीला नव्हतंच, असं तर शक्य नाही. अखेर ही प्रारंभाचीच तर विकसित अवस्था असते. सुरुवातीला लपलेलं असतं, ते अखेरीस समोर येतं.

पण तुम्ही गोष्टींकडे उलटय़ा क्रमाने बघा- अर्थात तुम्हाला काही दिसत असेल तर. पुन:पुन्हा तुम्हाला दु:खाकडे, वेदनेकडे, पश्चात्तापाकडे नेणाऱ्या रस्त्यांवरूनच तुम्ही चालत राहता. शेवटी दु:खच पदरी पडणार आहे, तर माणूस त्याच त्या गोष्टी पुन:पुन्हा का करत राहतो? का? कदाचित त्याला समोर दुसरा कोणता रस्ता दिसतच नाही. म्हणूनच मी म्हणतो की, तुमची दृष्टी अंधूक आणि विपरीत आहे; म्हणूनच मला प्रश्न पडतो, तुम्हाला दृष्टी आहे की नाही?

स्वत:च्या डोळ्यांचा खऱ्या अर्थाने वापर करणारे खूप थोडे लोक आहेत. प्रत्येकाला दोन डोळे असतात, तरीही बहुतेक लोक अंध असतात. जो माणूस स्वत:च्या आतमध्ये बघत नाही, तो डोळ्यांचा वापरच करत नाही. ज्या माणसाने स्वत्वाकडे बघितलं आहे, तोच डोळ्यांचा वापर करतो. जो माणूस स्वत:कडे बघू शकत नसेल, तो खरोखर अन्य काही पाहू शकेल का?

मित्रांनो, तुम्ही स्वत:कडे बघू लागता तेव्हाच तुमच्यात बघण्याची क्षमता येते. जेव्हा माणूस स्वत:कडे बघू लागतो, तेव्हाच तो आनंदाच्या दिशेने सरकू लागतो. मग तो सुखाकडे वळून बघत नाही आणि त्याच्यातला हा बदल इतरांनाही जाणवतो. सुखाची दिशा ही स्वत:कडून जगाकडे जाणारी आहे आणि आनंदाची दिशा जगाकडून स्वत:कडे येणारी.

आनंद ही नैसर्गिक जाणीव

आनंद हा माणसाचा स्वभाव आहे. आनंदाची काळजी करण्याची गरजच नाही, तो अगोदरपासूनच तुमच्यात आहे, तुमच्या हृदयात आहे. तुम्ही फक्त दु:खी राहणं थांबवा, दु:ख निर्माण करणाऱ्या यंत्रणेचं काम थांबवा; पण हे करायला कोणीच तयार दिसत नाही. लोक म्हणतात, ‘मला आनंद हवाय.’ हे तर एकीकडे मला चांगलं आरोग्य हवंय, असं म्हणत दुसरीकडे आजाराला चिकटून राहण्यासारखं आहे. तुम्ही आजाराला दूर जाऊच देत नाही. तुम्ही डॉक्टरांनी दिलेली औषधं घेत नाही, सकाळी चालायला जात नाही, पोहायला जात नाही, कोणताच व्यायाम करत नाही, खाण्याचा हव्यास सोडत नाही. तुमचं आरोग्य तुम्हीच नष्ट करून टाकता आणि दुसरीकडे म्हणता की, चांगलं आरोग्य हवंय. अनारोग्यकारक यंत्रणा मात्र बदलत नाही. आरोग्य ही कुठून तरी साध्य करून आणण्याची गोष्ट नाही, ते काही साध्य नाही. आरोग्य ही पूर्णपणे वेगळी जीवनशैली आहे. तुम्ही ज्या प्रकारे जगता, त्यामुळे आजार निर्माण होतात. तुम्ही ज्या प्रकारे जगता, त्यामुळे दु:खं निर्माण होतात.

लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की, त्यांना आनंदी राहायला आवडेल, पण ते मत्सर सोडू शकत नाहीत. मत्सराचा त्याग तुम्ही करत नाही, तोपर्यंत प्रेम निर्माण होऊ शकत नाही. प्रेमाच्या गुलाबाला मत्सराचं तण मारून टाकतं आणि प्रेम निर्माण झालं नाही, तर तुम्ही आनंदी होऊ शकत नाही. कारण प्रेमाशिवाय कोण आनंदी होईल? प्रेमाचा गुलाब तुमच्यात उमलला नाही, त्याचा सुगंध सर्वत्र पसरला नाही, तर तुम्ही आनंदी होऊच शकणार नाही.

आता लोकांना आनंद हवा असतो, पण नुसता हवा असणं पुरेसं नाही. तुम्हाला तुमच्या दु:खाच्या जाणिवेकडे बघावं लागेल. ती कशी निर्माण झाली- तुम्ही दु:खी कसे झालात- काय होतं तुमचं तंत्र? कारण आनंद नैसर्गिक आहे- जर कोणी आनंदी असेल, तर काहीच कौशल्य नाही, त्यासाठी काहीच विशेष करावं लागत नाही.

प्राणी आनंदी असतात, झाडं आनंदी असतात, पक्षी आनंदी असतात. मानव वगळला, तर संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. दु:ख निर्माण करण्याची हुशारी केवळ मानवातच आहे. हे कौशल्य कोणाकडेही नाही. म्हणूनच तुम्ही आनंदी असता, तेव्हा सगळं सोपं असतं, निष्पाप असतं; पण तुम्ही दु:खी असता, तेव्हा तुम्ही स्वत:सोबत काही तरी महान करता, तुम्ही खूप कठोर मेहनत घेत असता.

(‘द लाँग, द शॉर्ट अॅण्ड द ऑल’ या लेखाचा सारांश/ओशो टाइम्स इंटरनॅशनल/सौजन्य ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन/ www.osho.com)

भाषांतर – सायली परांजपे

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2018 1:28 am

Web Title: osho philosophy part 10
Next Stories
1 लक्ष, जाणीव आणि एकाग्रता
2 अवलंबित्व आणि स्वातंत्र्य
3 बी युअरसेल्फ
Just Now!
X