पालघर तालुक्यातील १० आश्रम शाळांमध्ये तपासल्या गेलेल्या ३९५७ विद्यार्थ्यांपैकी सुमारे ३१ टक्के विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण असल्याचे आढळले आहे. शिवाय या विद्यार्थ्यांमध्ये ठेंगणेपणा, कृशता, उंचीचे कमी प्रमाण इत्यादी बाबी आढळल्या. शिवाय वजन व उंची यांच्याशी आरोग्याचा संदर्भ जोडणारा बॉडी मास्क इंडेक्स (बीएमआय) कमी असल्याने ही बाब गंभीर झाली आहे. जिल्ह्यात पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे वजन व उंचीच्या आधारे त्यांना कुपोषित ठरवण्याची प्रक्रिया राबवली जाते. मात्र पाच वर्षावरील विद्यार्थी दुर्लक्षित असून त्यांच्यामधील कुपोषितपणा दुर्लक्षित राहिल्याने या घटकांकडे देखील जिल्हा प्रशासनाने आगामी काळात गांभीर्याने पाहणे आवश्यक झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तपासणी शल्यचिकित्सक अंतर्गत असणाऱ्या वाडा, जव्हार व कासा येथील विशेष पथकांद्वारे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत नियमितपणे केली जाते. मात्र आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे वय हे पाच वर्षांवरील असल्याने पाहणीचे अहवाल प्रसिद्ध केले जात आहेत.

पालघरच्या जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून सर जे. जी. समूह रुग्णालया अंतर्गत असणाऱ्या पालघरच्या आरोग्य पथका अंतर्गत पालघर तालुक्यातील १० आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांची तपासणी करून घेतली. या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक अनेक समस्या दिसून आल्या असून या दृष्टीने त्यांच्या आहारामध्ये बदल घडवून आणणे तसेच आश्रम शाळेतील आहार अधिक पोषक व सक्षम बनवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मुलांसाठी प्रथिनयुक्त अल्पोपहार तर मुलींसाठी ऍनिमिया प्रतिबंधक योजना, मासिक पाळी स्वच्छता मोहीम व सूक्ष्म पोषण गोळ्या देण्याची योजना असून त्यासोबत स्वच्छ पाणी, शौचालय, हात धुण्याच्या सुविधा यावर भर दिला जाणार आहे. या दृष्टीने पोषण आहार तज्ञ, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या सह मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या आहाराचा मेनूमध्ये सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे.

आदिवासी विकास विभागाने ज्या आश्रम शाळांमध्ये जेवण स्वतः तयार केले जाते यासाठी २८ फेब्रुवारी २०२४ रोजी शासन निर्णय काढून नाश्ता व आहार निश्चित केला आहे. मात्र कांबळगाव (बोईसर) सह राज्यात अन्य एका ठिकाणी मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून आहार देण्यासदर्भात ४ डिसेंबर २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता. या आहारामध्ये विविध पौष्टिक घटकांचे संतुलन ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात त्याचा विशेष लाभ पालघर जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आश्रम शाळेत दाखल होण्यापूर्वी तसेच दाखल झाल्यानंतर बालकांच्या आहारावर अधिक गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक झाले आहे.

पालघर जिल्ह्यात असणाऱ्या आदिवासी समाजात परंपरागत कृशतता व ठेंगणेपणा अंतर्भूत आहे. येथील आदिवासी बांधव व विशेषतः महिला काटक असूनही त्या अंग मेहनत करताना दिसतात. अशा अवस्थेत या महिलांकडून प्रसूती होताना त्यांच्या कमी वजनामुळे बालकांच्या वजनावर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बीएमआय ची तुलना सर्वसाधारण मुलांशी करण्याऐवजी इतर भागातील आदिवासी बांधवांशी व मुलांशी करायला हवी असा मतप्रवाह पुढे येत आहे. आदिवासींमधील काटकता व ठेगणेपणा हा त्यांच्या अनुवंशिकता, वारसा प्रमाणे अंगीकृत आला असून कोणत्याही बालकाच्या झपाट्याने वाढण्याच्या (संभाव्य वाढ पोटेन्शियल ग्रोथ) काळात त्यांच्या आहाराकडे अधिक बारकाईने लक्ष देणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील बालकांच्या एक ते पाच वर्षाच्या काळात तसेच पाच ते १२ वर्षाच्या कालावधीत त्यांना पूरक व पौष्टिक आहार मिळेल, गर्भवती व गरोदर मातांना चांगलं आहार मिळणे तसेच लहान बालकांना अधिक काळ स्तनपान मिळण्यासाठी ग्रामीण भागातील व विशेषता आदिवासी मातांमधील मानसिकता बदलण्याची गरज आहे.

पौष्टिक आहारासोबत मुलांना भूक लागण्यासाठी शारीरिक उपक्रम, खेळ यांची सांगड घालणे देखील आवश्यक असून त्यांची उंची, वजन वाढण्यासाठी समग्र अभियान आखणी करण्याची गरज आहे. विशेषता स्थलांतरित होणाऱ्या लहान बालकांकडे व गर्भवती, स्तनदा मातांच्या आहाराकडे देखील लक्ष देऊन त्यांच्याकडून जन्म होणाऱ्या बालकांच्या सुदृढते कडे लक्ष देण्याचे आवश्यक आहे.

मुळात जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. हे जरी खरे असले तरी पाच ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये आरोग्य विषयक अनेक त्रुटी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अगदी १८ वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये सुधारणा करण्यासाठी आश्रम शाळेतील आहारामध्ये वेगवेगळ्या पौष्टिक घटकांचा समावेश करणे व त्याचे सेवन होते याकडे लक्ष देणे देखील आवश्यक आहे. आरोग्य विभागाकडून तपासणी होत असली तरी विद्यार्थ्यांना मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून पुरवल्या जाणाऱ्या अल्पोपहार- जेवणाचा दर्जा उंचावणे, त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे.

कांबळगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून गेल्यावर्षी एका प्रसंगी जेवणातून आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली होती. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी केली असता मध्यवर्ती स्वयंपाक गृहात अनेक बाबींच्या आवश्यक नोंदी व तपासणी होत नसल्याचे दिसून आले. शिवाय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहारामधील पोषण तत्त्वांचा अभ्यास न करता सलगपणे एकाच प्रकारची भाजी उपलब्धतेप्रमाणे देणे, संतुलित आहार न देणे व आश्रम शाळा खाद्यपदार्थ वितरित करताना विलंब व दिरंगाई होणे असे प्रकार दिसून आले होते. आश्रम शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या स्वयंपाक गृहावर नियमित लक्ष ठेवण्यासाठी देखील स्वतंत्र कमिटी ठेवणे देखील गरजेचे असून सुदृढ माता तयार झाल्या तरच पुढील पिढी कुपोषणापासून दूर राहील या दृष्टीने नियोजन ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पूरक आहारासोबत जंतनाशक गोळ्यांचा नियमितपणे सेवन करणे व तपासणी अहवाल प्रसिद्ध करून त्यावर आधारित सुधारणा कार्यक्रमात निरंतर बदल करणे देखील गरजेचे झाले आहे.