पालघर : देशाच्या उभारणीसाठी आगामी काळासाठी गावपातळीवर आगामी सविस्तर विकास आराखडे तयार करून विविध इतर विकास योजनेचे अभिसरण करून जिल्ह्यात पुढील महिनाभरात आदी कर्मयोगी अभियान राबवले जाणार आहे. या अंतर्गत गावकरी व गावातील इतर घटकांच्या मदतीने गावाच्या विकासासाठी आवश्यक विकास कामांची माहिती संकलित करून आराखडा तयार करण्यात येणार आहे.
केंद्र शासनापासून गाव पातळीपर्यंत संपूर्ण शासन दृष्टिकोनाला प्रोत्साहित करून आखण्यात आलेल्या या उपक्रमात शेवटच्या टप्प्यावरील सेवा वितरणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ते व ग्राम परिवर्तन नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात जनभागीदारी व पीएमजनमन या योजनांचे अभिसरण करण्यात येणार असून धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानामध्ये जिल्ह्यातील ६५४ गावांमधील सुमारे ५५ हजार लाभार्थ्यांपर्यंत पायाभूत सुविधा पोहोचवण्यात आल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून पुढील विकास साधण्यात येणार आहे.
यापूर्वी गावाच्या उत्पन्न स्रोतांवर आधारित गाव पातळीवर वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखडे तयार केले जात असत. या नियोजनांतर्गत योजनांमध्ये निधीच्या मर्यादा असल्याने काही कामे ग्रामविकास विभागातर्फे केली जात असे. मात्र ग्रामविकास विभागाला देखील निधीची मर्यादा असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील महत्त्वकांक्षी विकास योजनांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत भविष्यात निधी उपलब्ध करून देण्यासाठी आदी कर्मयोगी योजना महत्त्वाची ठरणार असून गाव पातळीवरील आराखड्यांचे केंद्र शासनापर्यंत संकलित माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सामान्य सुविधा केंद्रांच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
पालघर जिल्ह्यातील सर्व ६५४ गावांमध्ये आदी कर्मयोगी योजना राबवण्यात येणार असून स्थानिक स्वयंसेवक, बचत गट, आदिवासी नेते, सेवाभावी संस्था, आशा सेविका इत्यादी अंतर्भूत असणारे आदी साथी तसेच शिक्षक, व्यावसायिक, मार्गदर्शक यांचा सहभाग असणाऱ्या आदी सहयोगी या योजनांमार्फत आदी कर्मयोगी योजना प्रभावीपणे राबवण्याचे विचाराधीन आहे.. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात येणाऱ्या विकास आराखड्यात गावातील सर्व घटकांचे समन्वय व नागरिकांचा सहभाग घेऊन आराखडा तयार केला जाणार आहे.
कशी आहे उपक्रमाची आखणी
पालघर जिल्ह्यासाठी जिल्हास्तरीय विविध शासकीय विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांच्यामार्फत आठ तालुक्यातील ब्लॉक लेवल मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षित केले जाणार आहे. या प्रशिक्षकांचा मार्फत १२ सप्टेंबर रोजी ग्रामनिहाय (ब्लॉक) ग्रामसेवक व इतर महत्त्वपूर्ण घटकांना मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन केले जाणार असून त्यानंतर ग्रामस्थ व सिविल सोसायटी संस्थांच्या समन्वयाने गावाचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
गावाचा विकास कृती आराखडा १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत वाचून दाखवण्यात येणार असून त्यावर प्राप्त होणाऱ्या हरकती सूचना यावर विचार करून २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत हा कृती आराखडा मंजूर करून देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधीची उपलब्धता आदिवासी विकास विभागाकडून करण्यात येणार असून सशक्त भारत ही संकल्पना प्रभावीपणे अमलात येण्यासाठी तळागाळात विकास साधण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, उपजिल्हाधिकारी रणजीत देसाई व इतर अधिकारी उपस्थित होते
समृद्ध पंचायत राज योजना
ग्राम स्तरावरील कामे योजना यांचे अभिसरण करून आधी कर्मयोगी उपक्रमा प्रमाणेच जिल्हा परिषदेमार्फत समृद्ध पंचायतराज योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावांच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या कार्यशाळेचे उद्या ४ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले असून विविध ग्रामपंचायतीने केलेल्या कामांचे मूल्यमापन करून तालुका व जिल्हा स्तरावर बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती मनोज रानडे यांनी दिली.