पालघर : जिल्हा मुख्यालय संकुलातील प्रशासकीय इमारत ‘ब’ चे बांधकाम बऱ्याच काळ रेंगळल्यानंतर अखेर या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या इमारतीमधील साहाय्यक धर्मादाय आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधकासह २४ जिल्हास्तरीय कार्यालये येत्या काही दिवसांत सुरू होण्याच्या स्थितीत आहेत.
सप्टेंबर २०२१ पासून जिल्हा मुख्यालय संकुलातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय कार्यरत झाल्यानंतर प्रथम २०२१ वर्षांखेरीपर्यंत व नंतर जानेवारीपर्यंत प्रशासकीय इमारती सुरू करण्याचे सिडकोतर्फे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासकीय इमारत ‘अ’चे भोगवटा प्रमाणपत्र ३१ जानेवारी रोजी देण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात अंतर्गत काम व विद्युत जोडणीला विलंब झाल्याने या इमारतीतील कार्यालये एप्रिल महिन्यात सुरू झाली होती.
दरम्यान प्रशासकीय ‘ब’ इमारतीच्या उभारण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. तसेच या इमारतीमध्ये फॉल सीलिंगचे काम ऑगस्ट अखेपर्यंत सुरू राहिले. त्याचबरोबर विद्युत जोडणी करण्याचे काम विलंबाने झाल्याचे दिसून आले आहे. ८ ऑगस्ट रोजी या इमारतीला सिडकोने भोगवटा प्रमाणपत्र दिले असून या इमारतीत साहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सुरू झाले आहे. या इमारतीमध्ये आपली आस्थापने सुरू करावीत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागांना दिल्या आहेत. या प्रशासकीय ‘ब’ इमारतीमधील २४ कार्यालये लवकरच कार्यरत होतील असे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
प्रशासकीय इमारतीतील कार्यालये
साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, साहाय्यक संचालक नगर रचना, जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, संशोधन अधिकारी जिल्हा जात पडताळणी समिती, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, उपवन संरक्षक (डहाणू), सामाजिक वनीकरण विभाग, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, जिल्हा जलसंधारण अधिकारी (मृद व जलसंधारण विभाग), साहाय्यक नियंत्रक वैद्यमापनशास्त्र, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप कार्यालय, लेखाधिकारी वेतन पडताळणी पथक, दुय्यम निबंधक कार्यालय (१ व २), कृषी क्षेत्र अधीक्षक पशुपैदास व संगोपन केंद्र व विद्युत निरीक्षक.