डहाणू : वांद्रे ते अमृतसर जाणाऱ्या रेल्वेमध्ये रविवार २८ सप्टेंबर रोजी दुपारी १.२० वाजताच्या सुमारास डब्यांच्या जोडणीत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, ही अडचण वाणगाव आणि डहाणू स्थानकांदरम्यान घडली असून यामुळे गाडीचे डबे काही काळासाठी वेगळे झाले होते. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले होते.

ही समस्या त्वरीत दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करून या घटनेची माहिती दिली आणि यात कोच ए १ आणि ए २ (इंजिनपासूनचा पाचवा आणि सहावा डबा) यांच्या जोडणीमध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट केले.

तांत्रिक अडचण तात्पुरती दूर केल्यानंतर गाडी पुढे निघाली, मात्र संजान स्थानकावर पोहोचताच ही समस्या पुन्हा एकदा दिसून आली. रेल्वे प्रशासनाने तातडीने पुढील दुरुस्तीचे काम हाती घेतले. जोडणीची समस्या पूर्णपणे दूर करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक संजान स्थानकाजवळ घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी ही माहिती समाजमाध्यमांवर त्वरित दिली, जेणेकरून गोंधळ निर्माण होणार नाही. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून ही तांत्रिक समस्या सोडवल्यानंतर लवकरच अमृतसर एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना होईल. या घटनेमुळे रेल्वेच्या अन्य कामकाजावर किंवा वेळापत्रकावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नाही. प्रवाशांना झालेल्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली असून, त्यांनी शांतता राखून सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.