वाडा : “भिवंडी–वाडा–मनोर” या ६४ किमी महत्वाच्या राज्यमहामार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून, तब्बल ७७७ कोटींचं काम ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून करण्यात येत आहे. मात्र, या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम करताना रस्त्यानजीक असलेल्या बांधकामांमुळे मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे

“भिवंडी – वाडा – मनोर” महामार्गापैकी भिवंडी – वाडा या मार्गावरील “भिवंडी – अंबाडी (रेवदी) तर “डाकीवली फाटा – वाडा” या ४० किमी अंतराचे दोन टप्प्यांमध्ये एका वर्षापूर्वी काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांमुळे यंत्रसामग्री हालवणे आणि बांधकाम सुरू ठेवणे कठीण झाले आहे.

भिवंडीपासून वाडा व पुढे मनोरकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा अनेक ठिकाणी मोठ मोठे कारखाने असून त्यांची संरक्षण भिंत, दुकानांची शेड, घरांचे भाग आणि पदपथावरील दुकाने, टपऱ्या अशी बांधकामे रस्त्याच्या कामात अडथळे ठरत आहेत.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या बांधकामांवर यापूर्वी नोटिसा बजावल्या असल्या, तरी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण कायम आहे. अशा स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न होता चालढकल केली जात असल्याचा आरोप व नाराजी स्थानिक नागरिकांनी केला आहे.”भिवंडी–वाडा–मनोर” मार्ग दळणवळणासाठी अत्यंत महत्वाचा राज्य महामार्ग असुन तो ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांना तर गुजरात राज्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा असल्याने वाहतुकीची गर्दी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्ता लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रवाशांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते जयेश घोडविंदे, अनिल पाटील, किरण दुपारे, सचिन पाटील आणि दिपेश पष्टे यांनी पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांना निवेदन देत अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करून रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लावण्याची मागणी केली आहे. “जर अनधिकृत बांधकामं तत्काळ काढण्यात आली नाहीत, तर भविष्यात रस्ता अरुंद राहिल्यामुळे अपघाताची शक्यता वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या प्रश्नावर बैठक घेऊन योग्य ती कारवाई करावी.” अशी मागणी केली आहे. दरम्यान, याप्रश्नी लवकरच प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागांची संयुक्त बैठक बोलवणार असल्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले.

“वाडा – डाकिवली फाटा” या मार्गाचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असुन खुपरी, नेहरोली, कुडूस, वडवली अन्य अशा काही भागात कामामध्ये अडथळे येत असून तेथील स्थानिकांशी सामंजस्याने चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहोत. कोका कोला कंपनीचे संरक्षण भिंतीचे कंपाऊंड, कठडे रस्त्यावर येत असल्याने त्यांना त्वरीत काढण्याच्या सूचना केल्या आहेत. संबंधित जागा मोकळ्या झाल्या की रुंदीकरणाचे काम सुरळीत पार पाडता येईल,” परंतु जर काम करताना अडथळे कायम राहिल्यास कायदेशीर मार्गाने कारवाई केली जाईल. अजय जाधव, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर