पालघर : घोलवड, डहाणू येथील चिकू फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असणाऱ्या या नाशिवंत फळाला दर मिळण्यास मर्यादा येत असे. घोलवड-बोर्डी चिकू फाउंडेशन मार्फत अत्याधुनिक चिकू प्रक्रिया केंद्र गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत केले असून दररोज सुमारे ५०० किलो चिकू फळावर प्रक्रिया करण्यास आरंभ झाला आहे.

सर्वसाधारणपणे १५ ते २० रुपये प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या चिकूपासून तयार होणारी पावडर व चकत्या १००० ते ५००० रुपये प्रति किलो या दराने विकली जात असून यामुळे येथील स्थानिक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात कार्यरत असणारा हा समूह विकास योजनेतील एकमेव प्रकल्प असून या ठिकाणी तयार होणाऱ्या उत्पादनाच्या व्यवस्थेसाठी नवीन योजनेची आखणी केली जात आहे.

“एक जिल्हा, एक उत्पादन” या योजनेत जिल्हा प्रशासनाने चिकू फळाची निवड केली होती. मात्र या नाशिवंत फळाच्या प्रक्रिया करण्याच्या मर्यादा असल्याने बोर्डी येथील अमोल पाटील, नीलकांत राऊत, प्रणील सावे, निखिल राऊत, संगीता सावे, प्रतिश राऊत, सिद्धार्थ पाटील, अनिकेत राऊत अशा १० मंडळींनी ३० इतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून घोलवड बोर्डी चिकू फाउंडेशनची स्थापना केली. शासनाच्या समूह विकास योजना अर्थात क्लस्टर योजनेच्या माध्यमातून चिकू फळाच्या मूल्यवर्धनासाठी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीला सन २०२३ मध्ये काम हाती घेण्यात आले. अडीच कोटी रुपयांच्या भाग भांडवलासह एकूण साडेसात कोटी रुपयांचा खर्च करून या प्रक्रिया केंद्राचे काम २०२४ मध्ये पूर्ण झाले होते.

सन २०२३ पासून सातत्याने नैसर्गिक आपत्तीमुळे हा भाग बाधित झाल्याने चिकू उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव लगत ब्राह्मणगाव येथे चिकू फळाच्या प्रक्रियेसाठी असलेले सामान्य सुविधा केंद्र प्रत्यक्षात कार्यरत होण्यास विलंब झाला. नैसर्गिकरीत्या पिकलेल्या चिकू फळाप्रमाणेच प्रक्रिया होणाऱ्या फळाची चव, गुणधर्म तसेच पोषणमूल्य कायम राहावे यासाठी प्रक्रिया केंद्राची आखणी करण्यात आली आहे. हे केंद्र एप्रिल २०२५ पासून कार्यरत झाले असून आजवर २० टनपेक्षा अधिक चिकू फळावर प्रक्रिया केली गेल्याची माहिती घोलवड बोर्डी चिकू फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी लोकसत्ता ला दिली.

डहाणू तालुक्यात बहराच्या वेळी ३०० टन तर इतर वेळी ५० टनाच्या जवळपास चिकूचे उत्पादन होत असते. त्यापैकी सुमारे १० टक्के फळाचे नुकसान वेगवेगळ्या कारणामुळे होताना दिसते. उत्पादित होणाऱ्या उच्च दर्जाच्या चिकू फळाला स्थानिक पातळीवर चांगले दर मिळण्यासाठी तसेच स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी चिकू प्रक्रिया केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कमी उद्योग विभागाच्या सह संचालक वि.मु शिरसाट व त्यांच्या सहकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

कशा प्रकारे होते प्रक्रिया

उच्च दर्जाचे चिकू फळ बाजारातून अथवा व्यापाऱ्यांकडून विकत घेतल्यानंतर त्याची धुलाई केली जाते. त्यानंतर इथिलीन वायूच्या मदतीने नियंत्रित वातावरणात चिकू फळ पिकवण्याची प्रक्रिया केली जाते. चिकू फळाचे आवरण सोलणे (पीलिंग) व त्यामधील चिकट पदार्थ बाजूला काढून हे फळ सुकविण्यासाठी तयार केले जाते.

बाजारातील मागणीप्रमाणे चिकू पासून चकत्या (चिप्स) व पावडर तयार करण्याची यंत्रसामुग्री या प्रक्रिया केंद्रात उपलब्ध असून देशातील बाजारपेठेसाठी अधिक तर ” ट्रे- ड्राइंग” पद्धतीचा अवलंब करून उत्पादने तयार केली जातात. यासाठी प्रक्रिया केंद्रातीन विद्युत ड्रायर (डिहायड्रेटर) कार्यरत असून सूर्यप्रकाशावर अवलंबून न राहता बारमाही प्रक्रिया करण्याची व्यवस्था कार्यरत आहे. या पद्धतीने तयार केलेल्या चकत्या अथवा पावडर या सरासरी ९०० ते १००० रुपये किलो इतक्या दराने बाजारात विकल्या जातात.

प्रामुख्याने निर्यातीसाठी दोन वर्षाच्या साठवणुकीच्या क्षमता असणाऱ्या फ्रीज ड्रॉईंग पद्धतीचा अवलंब केला जात असून या पद्धतीचा उत्पादन खर्च अधिक असला तरी फ्रिज ड्राइंगद्वारे तयार केलेली उत्पादने विशिष्ट प्रकारे पॅकिंग केल्यानंतर सहा हजार ते नऊ हजार रुपये प्रति किलो इतक्या दराने बाजारात विकली जात असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

सद्यस्थितीत या प्रक्रिया केंद्रात ५०० किलो चिकू फळावर प्रक्रिया करण्यात येत असून या प्रकल्पाची क्षमता दररोज दीड टन फळावर प्रक्रिया करण्याची क्षमता आहे. चिकू सोबतीने आंबा, फणस, जांभूळ या फळांची प्रक्रिया करण्याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी झाली आहे. नाशिवंत फळांचा साठवणूक कालावधी (शेल्फ लाईफ) वाढवण्यासाठी प्रक्रिया करण्याचे प्रयोग सुरू असून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाची प्रभावी विक्री व मार्केटिंग करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. – अमोल पाटील, अध्यक्ष- घोलवड बोर्डी चिकू फाउंडेशन