पालघर : समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाकरिता (डीएफसी) सफाळे व नवली फाटक कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पालघर येथील नवली परिसरातील नागरिकांना देण्यात आलेल्या पर्यायी भुयारी मार्गात अवकाळी पावसातच पाणी साचल्यामुळे चिखलीयुक्त रस्त्यातून वाट काढणे नागरिकांना अवघड होत आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम देखील अद्याप प्रलंबित असल्यामुळे जून महिन्यात सुरु होणाऱ्या पावसात नागरिकांना भुयारी मार्गातून प्रवास करणे अशक्य होणार आहे.

डीएफसीसी संजाण ते सफाळे दरम्यान कार्यरत झाल्यामुळे १० एप्रिल पासून नवली रेल्वे फाटक वाहतुकीसाठी कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. नवली येथील नागरिकांना कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने तसेच उपलब्ध असलेले पर्यायी मार्ग हे किचकट, लांब व वळसा घालून असल्याने नागरिकांना हा पर्यायी मार्ग अवलंबताना त्रास सहन करावा लागतो.

नवली फाटक बंद झाल्यानंतर फाटकाच्या पूर्वेकडून दक्षिणेकडे जवळपास ७०० ते ८०० मीटर अंतरावर भुयारी मार्ग (अंडरपास) उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मात्र सहा व सात मे रोजी झालेल्या अवकाळी पावसात या अंडरपास मध्ये पाणी साचून राहिले. त्यामुळे या भागातून प्रवास करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. तर पाणी साचल्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेकांच्या दुचाकीचा तोल जाऊन किरकोळ अपघात घडले. पुढील काही दिवसांमध्ये सुरु होणाऱ्या पावसाळ्यामध्ये या भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागणार असे चित्र दिसते आहे.

पर्यायी मार्गांकरिता दोन किलोमीटरचा वळसा

पूर्वेकडून या भुयारी मार्गातून गेल्यानंतर पश्चिमेकडे हा रस्ता लोकमान्य नगर परिसरातून कचेरी रोड कडे निघतो. त्यामुळे रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या नागरिकाला दोन ते अडीच किलोमीटरचा वळसा घालून रेल्वे स्टेशन गाठावे लागते. याव्यतिरिक्त पालघर पूर्व पश्चिमेला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग १६०अ वरून अवजड, मालवाहू, बस, चारचाकी, दुचाकी यांना देखील नवली येथून जवळपास दोन किलोमीटरचा वळसा घालून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून रेल्वे स्टेशन गाठावे लागते.

नागरिक पर्यायी मार्गाच्या प्रतीक्षेत

गेल्या काही वर्षात नवलीच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना फाटक हा एकमेव पर्याय उपलब्ध होता. मात्र फाटक बंद नंतर रेल्वे प्रशासनाने नागरिकांना उपलब्ध करून दिलेले पर्याय हे त्रासदायक व वेळखाऊ असल्याने नवली येथील नागरिक सुस्थितीत पर्याय उपलब्ध होईल या प्रतीक्षेत आहेत.

फाटक बंदचा त्रास…

पालघर पूर्वेकडील नवली, वेवूर, वरखुंटी, कमारे या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना नवली फाटक बंद झाल्याचा फटका बसला आहे. फाटकाच्या पश्चिमेकडे प्राथमिक – माध्यमिक शाळा, ग्रामीण रुग्णालय, कचेरी, पोलीस स्टेशन व इतर महत्त्वाची कार्यालये असल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचा दिवसभर या मार्गाने प्रवास सुरू असतो. तसेच फाटकाच्या पूर्वेला नवली परिसरात मोठमोठाली गृह संकुले असल्याने यामध्ये राहणारे जवळपास चार ते पाच हजार नागरिक व अनेक वाहने या मार्गाने सतत प्रवास करत असायची.

नवली उड्डाणपुलाची प्रतीक्षा

नवली येथील उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून जून मध्यपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणे अपेक्षित आहे. नवली फाटक बंद झाल्यामुळे नागरिकांना झालेल्या त्रासाला काही अंशी या उड्डाणपुलाचा आधार मिळेल. नवली फाटक रस्त्याची उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरावस्था झाली असून पावसाळ्यापूर्वी हा पूल सुरू होणे आवश्यक आहे. मात्र सध्या सुरू असलेले नवली उड्डाणपुलाचे काम बघता हा पुल महिन्यात सुरू होण्यास विलंब होण्याचा अंदाज नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे….

नवली रेल्वे पूलाचे काम जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवली येथील उड्‌डाणपूल नागरिकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील.

नवली रेल्वे फटका वरील पूल उभारण्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाला पश्चिमेला एक तर पूर्वेला दोन खांब (पिलर) उभारण्याचे काम सुरू आहे. पूर्वेच्या बाजूला १६- १७ मे पर्यंत तर पश्चिमेच्या खांबावर २५ मे पर्यंत बॉर्डर बसवणे अपेक्षित आहे. सोबत पुलाच्या भागाचे कॉंक्रिटीकरण करणे व त्यासोबत गर्डर व काँक्रीट भागाचे मजबुतीकरण करणे (क्युरिंग) साठी १५ ते २१ दिवसांचा अवधी लागणे अपेक्षित आहे. हे पाहता नवली उड्डाण पुलावरून १५ जून चा सुमारास शालेय विद्यार्थी, सायकल व दुचाकी यांना प्रवास करणे शक्य होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या मोसमात हंगामी भुयारी मार्ग वापरावा लागणार नाही. – पोपट चव्हाण, उपभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग