पालघर: विक्रमगड नगरपंचायतीमध्ये मालमत्ता कराची वसुली करताना जुन्या व वापरात नसलेल्या पावती बुकांचा तसेच नव्याने बनावट पावती बुक छापून मालमत्ता कराचा अपहार करण्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे नगरपंचायतीने आरंभिले आहे.

विक्रमगड नगरपंचायतीच्या मालमत्ता कराच्या वसुली प्रकरणात एका शासकीय कर्मचाऱ्यांनी अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने मागील काही आर्थिक वर्षात वापरले न गेलेल्या पावती पुस्तकांचा वापर करून मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना पावती दिल्या. तसेच नगरपंचायतीच्या पावती पुस्तकाप्रमाणे बनावट पावती पुस्तक छापून त्यामधील पावत्या नागरिकांना अदा केल्याची माहित पुढे आली आहे.

हेही वाचा >>>पालघर : प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड, फलाटावर लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन

थकबाकीदारांना रक्कम भरण्यासाठी सूचना आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. या संदर्भात नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांनी पोलिसांकडे फिर्याद नोंदवल्यानंतर संबंधित शासकीय कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचे कबूली दिली. तसेच बनावट पावती दिलेल्या चा तपशील व वसूल केलेले रक्कम नगर परिषदेकडे २४ तासात जमा करू असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

पावती बुकांचे आधारे अपहार करणाऱ्या कंत्राटी कामगारांवर हाकलपट्टी करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे विक्रमगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजय साबळे यांनी लोकसत्ता ला सांगितले. तर शासकीय सेवेत असणाऱ्या मालमत्ता कर वसुली कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करून त्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे प्रस्तावित आहे. या चौकशीनंतर संबंधिताविरुद्ध आवश्यकता भासल्यास स्वतंत्रपणे दाखल करण्यात येईल असे ही सांगण्यात आले.

हेही वाचा >>>शहरबात : जिल्ह्यातील मनोरुग्णांची बिकट अवस्था

मालमत्ता कराचा अपहार हा किमान एक लाख रुपयांचा असल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तरी देखील ही रक्कम चौकशी दरम्यान वाढेल अशी चिन्ह आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांना काही राजकीय मंडळी वाचवण्याचा प्रयत्न करत असून दोशी व्यक्तीविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे येत आहे.