बोईसर : मान्सून हंगामात पालघर जिल्ह्यात ११० टक्के पावसाची नोंद झाली. कोकण विभागात पालघर जिल्ह्यात सरासरी सर्वात जास्त पाऊस झाला आहे. चांगल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणे काठोकाठ भरली असून पुढील पुढील वर्षभरासाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
१ जून ते ३० सप्टेंबर २०२५ या मोसमी हंगामात पालघर जिल्ह्यात ११० टक्के पाऊस झाला. कोकण विभागात पालघर जिल्ह्याची पावसाची सरासरी सर्वाधिक नोंदवली गेली. जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत पालघर जिल्ह्यात सरासरी २३०५ मिमी पाऊस अपेक्षित असताना सरासरीपेक्षा अधिक एकूण २५५३ मिमी (११०.७%) पावसाची नोंद झाली. २०२४ मध्ये १०८ टक्के पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत या वर्षी दोन टक्के अधिक पाऊस झाला आहे. याचवेळी संपूर्ण कोकण विभागात मात्र सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९७ टक्के पाऊस झाला.
जिल्ह्यात जव्हार तालुक्यात सर्वात जास्त २८४० मिमी तर सर्वात कमी वसई तालुक्यात २५०२ मिमी पावसाची नोंद झाली. तर डहाणू तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त १३२.९ टक्के पाऊस झाला असून वसई तालुक्यात सरासरीपेक्षा कमी ९२.६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली. जुलै महिन्यात झालेल्या अल्प पावसामुळे चिंता वाढली होती.
मात्र जून,ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या दमदार पावसाने सर्व कसर भरून काढली. सप्टेंबर महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसाने यावर्षीच्या पावसाचा कोटा पूर्ण होण्यास मदत झाली. चांगल्या पावसाने जिल्ह्यातील सर्व प्रमुख जलाशय शंभर टक्के भरले असून वर्षभर पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा साठा तयार झाला आहे.
तीन महिने दमदार पाऊस
जिल्ह्यात जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दमदार पाऊस झाला. जून महिन्यात ५७७.८ मिमी (१४०.३ टक्के), ऑगस्ट महिन्यात ६६३.१ मिमी (९९ टक्के) आणि सप्टेंबर महिन्यात ६७८.६ मिमी (२१२.९ टक्के) पाऊस पडला. मात्र जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्याने फक्त ६३३.६ मिमी (७० टक्के) पावसाची नोंद झाली होती. जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने हळवे भात धोक्यात आले होते.
तसेच जव्हार, मोखाडा, विक्रमगड या डोंगराळ भागात सिंचनाच्या फारश्या सोयी उपलब्ध नसल्याने शेतकरी फक्त खरीप हंगामातील पिकांवर अवलंबून असतो. बहुतेक सर्व परीसर उंच सखल टेकड्यांचा असून अल्पभूधारक असलेला शेतकरी भात, वरी, नागली, उडीद सारख्या पिकांची लागवड करून त्यामधून येणार्या उत्पन्नावर वर्षभर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत असतो.
डोंगर उतारावर पावसाचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्याने शेतजमीन लवकर कोरडी होऊन लागवड केलेली पिके करपू लागली होती. मात्र ऑगस्ट महीन्यात पावसाने पुनरागमन केल्याने पिकांना जीवनदान मिळाले.
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा जोरदार तडाखा
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर पावसाच्या तडाख्याने भातशेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात ३१८.८ मिमी पाऊस अपेक्षित असताना तब्बल ६७८.६ मिमी म्हणजे सरासरीपेक्षा अधिक २१२.९ टक्के इतका प्रचंड पाऊस झाला.