नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पती पत्नीच्या किरकोळ भांडणात पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी पती फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. बंडू कवटे (५०) असे आरोपी पतीचे नाव असून जयश्री (४५) असे मृत पत्नीचे नाव आहे.
हेही वाचा- पावसामुळे घर कोसळून मोठे नुकसान; वयोवृद्ध दाम्पत्य उघडय़ावर
नालासोपारा पुर्वेच्या लक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या आरोपी बंडू याने रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केली. बंडू आणि जयश्री यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडण सुरू होते. बंडू बेरोजगार होता. यावरून दोघांत सतत भांडण होत होते. शनिवारी रात्री असाच प्रकारचे भांडण झाले असता या भांडणाचा राग मनात ठेऊन त्याची पत्नी साखर झोपेत असताना त्याने तीचा गळा आवळून हत्या केली. आरोपीच्या शेजारच्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. जयश्रीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली आहे.