बोईसर : बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत तारापूरमधील उद्योगांकडून विविध तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. उद्योग चालविण्यासाठी शासनाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची बाब मांडत स्थानिक पातळीवर देखील अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याने याबाबतीत तातडीने उपाययोजना न केल्यास भविष्यात उद्योगधंदे अडचणीत येण्याची चिंता उद्योजकांनी आमदारांसमोर व्यक्त केली. उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण लवकरच वरीष्ठ पातळीवर संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचे आश्वासन आमदार विलास तरे यांनी उद्योजकांना दिले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात जवळपास १२०० कारखाने कार्यरत आहेत. औषधनिर्मिती, अभियांत्रिकी व रासायनिक उद्योग क्षेत्रातील अडचणी, प्रश्न व मागण्यांच्या अनुषंगाने आमदार विलास तरे यांच्या अध्यक्षतेखाली टिमा सभागृह येथे बैठक पार पडली. या बैठकीला औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांचे मालक, प्रतिनिधी आणि एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय, कामगार या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रात उत्तम रस्ते, वाहनतळ आणि बंदीस्त गटारे या सारख्या पायाभूत सुविधांचा अभाव, विजेची अपुरी उपलब्धता, सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी, परवानगी प्रक्रियेतील विलंब आणि स्थानिक पातळीवरील प्रशासनिक अडचणी यांसारख्या प्रश्नांवर उद्योगांनी चिंता व्यक्त केली. यावेळी आमदार विलास तरे यांनी उद्योगांच्या समस्या ऐकून स्थानिक पातळीवरील अडचणी सोडवण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात आर्थिक अडचणींमुळे कारखाने बंद पडण्याचे प्रमाण वाढत असून स्वस्त वीजदर आणि आकर्षक सवलतींमुळे काही उद्योग परराज्यात स्थलांरीत होत आहेत. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील काही समस्यांवर ठोस तोडगा काढण्यात आला असून, ज्या बाबींसाठी राज्य शासनाच्या हस्तक्षेपाची गरज आहे, त्या संदर्भात लवकरच मंत्रालयात संबंधित मंत्री पातळीवर उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार असल्याचे आमदार तरे यांनी स्पष्ट केले.
तारापूरमधील उद्योगांसमवेत बैठकीला अन्न व औषध प्रशासन संचालनालयाचे सह आयुक्त भूषण पाटील, कामगार विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत महाले, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उप संचालक अमोल बाईत, एमआयडीसीचे उप अभियंता अविनाश संखे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी राजू वसावे, माजी आमदार अमित घोडा, बोईसर ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच नीलम संखे, टीमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी उपस्थित होते.
वस्त्रोद्योगाचा झोन बदल करून थकीत अनुदानाची मागणी :
तारापूर एमआयडीसीमधील वस्त्रोद्योगांचा झोन बदलून संबंधित उद्योगांना थकीत असलेले भांडवली व विजेचे अनुदान तात्काळ द्यावे,” अशी मागणी आमदार विलास तरे यांनी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. तारापूर औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेल्या अनेक वस्त्रोद्योगांना शासनाच्या अनुदान योजनेचा योग्य लाभ मिळत नाही. कारण या भागाचा वस्त्रोद्योग झोन ‘मुंबई क्षेत्र’ म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे, ज्यामुळे मिळणारे अनुदान अत्यल्प असून त्यातही वेळेवर वितरण होत नाही.” या झोनिंगमुळे उद्योगांना आर्थिक फटका बसत असून, अनेक उद्योजकांमध्ये असमाधानाची भावना निर्माण झाली आहे. परिणामी, काही उद्योग गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याची बाब आमदार तरे यांनी निदर्शनास आणून दिली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत टिमा च्या सहकार्याने बैठक घेतली. या बैठकीत उद्योजकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. – विलास तरे, आमदार