पालघर : डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती वॉर्डातील स्लॅबचे प्लास्टर रुग्णाच्या खाटेवर कोसळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उपजिल्हा रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे इमारतीच्या स्लॅबला ठिकठिकाणी तडे गेले असून त्यातूनच एका ठिकाणी शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास प्लास्टर कोसळले आहे. सुदैवाने या खाटेवर रुग्ण नव्हता मात्र शेजारच्या खाटेवरील महिला थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा : चिखलात लपून बसलेल्या संशयित खुनीला पकडले
रुग्णालयात उपस्थित रुग्णांनी दिलेल्या माहिती नुसार सकाळी ९.३० च्या सुमारास अचानक स्लॅबचे प्लास्टर निखळून खाली पडले. सुदैवाने खाटेवर रुग्ण नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र यामुळे रुग्णांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली असून जीर्ण इमारतीत उपचार घेणे धोकादायक ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली. याविषयी डहाणू उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी बालाजी हेंगणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहिती नुसार इमारत जीर्ण झाल्यामुळे इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. याविषयी सार्वजनिक बांधकाम उपविभाग डहाणू यांना वेळोवेळी सूचना देऊन सुधारणा करून घेण्यात येत आहेत. शुक्रवारी घडलेली घटना अनपेक्षित होती. याविषयी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचित करण्यात आले असून दुरुस्ती करण्यात येणार आहे.