व्यवस्थापन प्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्प्यात
विजय राऊत
कासा : मागील काही वर्षांपासून जव्हारमधला कचरा भूमीचा प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहे. शहरातील रस्त्याच्या बाजूला कचरा प्रक्रिया केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुक्या कचऱ्याच्या यंत्रणेचे काम पूर्ण झाले असून ओल्या कचऱ्याच्या यंत्रणेचे काम शिल्लक आहे. हे कामही पुढील एक ते दीड महिन्यांत पूर्ण होईल. असे नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी सांगितल.
जव्हार हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुंबई, ठाणे, नाशिक या ठिकाणाहून अनेक पर्यटक येथील सौंदर्य स्थळांना भेट देत असतात. ह्य शहरात यशवंतराव मुकणे यांचा जयविलास पॅलेस, हनुमान टेकडी, सनसेट पॉईंट, शिरपामाळ, इत्यादी पर्यटनस्थळे आहेत. परंतु शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून संस्थानकालीन वास्तूू असणाऱ्या जुन्या राजवाडा लगत व जव्हार- ठाणे,पालघर, डहाणू या शहरांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला मोठी कचराभूमी आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत असतो. शहरात प्रवेश करताना सुरुवातीलाच ही कचराभूमी दृष्टीस पडते. त्याच्यासमोरच सनसेट पॉईंट सारखे सुंदर पर्यटन स्थळ आहे. या कचराभूमीवर अनेक मोकाट जनावरे यांचा वावर असतो. त्यामुळे या रस्त्यावरून येण्या-जाणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता असते. मागील कित्येक वर्षांपासून कचराभूमीच्या प्रश्नावरून येथील स्थानिक रहिवाशांनी अनेक मोर्चे काढले होते. शहराच्या रस्त्याच्या बाजूला नगरपरिषदेने कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा बसवण्याचे काम सुरू केले आहे. मागील एक दोन वषार्ंपासून हे काम सुरू आहे. त्यामुळे पुढच्या महिन्याभरात हे काम पूर्ण होईल का? याबाबत साशंकता व्यक्त होते.
जव्हारमधील कचरा व्यवस्थापनासाठी प्रक्रिया केंद्राचे काम पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे जव्हारमधील कचराभूमीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
–प्रशांत बोरकर, मुख्य अधिकारी नगरपरिषद
गेल्या अनेक वर्षांंपासून जव्हारच्या कचरा विल्हेवाटीचा प्रश्न प्रलंबित आहे. लवकरच कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होऊन कचऱ्याच्या समस्येपासून जव्हारकरांची सुटका होईल, अशी आशा आहे. – देवा महाले, नागरिक