कासा: तलासरी तालुक्यातील धामणगाव आणि करंजगाव परिसरात आज सकाळच्या सुमारास बिबट्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी महिला आणि पुरुषावर जीवघेणे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या तलासरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.
करंजगाव पाटीलपाडा परिसरात सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास पहिली घटना घडली. गुलाब मधुकर वरठा ही महिला चिकूच्या वाडीत काम करत असताना वाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला चढवला. तिच्या किंकाळ्या ऐकून आजूबाजूचे लोक धावून आले, त्यानंतर बिबट्याने तेथून पळ काढला.
सकाळी नऊच्या सुमारास दुसरी घटना घडली. धामणगाव आपटोलपाडा येथील राज्या काकड्या चिमडा हे मिरचीच्या वाडीत काम करत असताना त्यांच्यावरही बिबट्याने अचानक हल्ला केला. काही क्षणांनंतर या ठिकाणाहूनही बिबट्याने धूम ठोकली.या दोन्ही घटनांनंतर वनविभाग आणि वाईल्डलाईफ विभागाने तातडीने शोध मोहिम राबवली आहे. बिबट्याला लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
या घटनेमुळे तलासरी परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून गावकरी वाड्यांमध्ये काम करताना किंवा रस्त्यावरून जाताना गटानेच जाण्याचा सल्ला घेत आहेत. वनविभागाकडून देखील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शक्यतो एकटे न जाता, एकमेकांची साथ घेऊन वावरावे, आणि वाड्यांमध्ये काम करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, बिबट्या अन्नाच्या शोधात वस्तीशी लागून असलेल्या वाड्यांमध्ये फिरत असावा. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला जेरबंद करण्यासाठी सापळे लावले जात असून विभागाकडून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत.
गेल्या महिन्यात मोखाडा परिसरात एका माकडाने वनविभागाच्या कर्मचार्याची डोकेदुखी वाढवली होती. अखेर मागील आठवड्यात हे माकड पवारपाडा नजिकच्या पेट्रोल पंपाजवळील हाॅटेल जवळ येताच, वनविभागाच्या कर्मचार्यानी जाळ्यात अडकवुन या माकडाला जेरबंद करुन पिंजर्यात डांबले आहे. त्यामुळे दहशती खाली वावरणार्या नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या माकडाला आता त्र्यंबकेश्वर येथील ब्रम्हगिरी पर्वतावर त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याची माहीती वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र निकम यांनी दिली आहे.