डहाणू : डहाणू तालुक्यात बिबट्याच्या वाढत्या वावराने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला नरपड गावात गायीच्या वासराला लक्ष्य केल्यानंतर, सोमवार २१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चिखले गावातील काकडपाडा येथील आदिवासी वस्तीत बिबट्याने शिरकाव करून दोन बकऱ्यांना ठार केले आहे. वन विभागाने घटनेची दखल घेतली असून, शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यासोबतच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

सोमवारी चिखले येथील काकडपाडा येथे रेल्वे उड्डाणपूलानजीकच्या आदिवासी वस्तीत रवी रामदास खाचे यांच्या गोठ्यातील बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार झाल्या असून एक बकरी गोठ्यात मृतावस्थेत आढळली, तर दुसरी बिबट्या घेऊन गेल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच, डहाणूच्या सहायक वन संरक्षक प्रियंका पाटील आणि बोर्डी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनेचा पंचनामा केला असून, नियमानुसार शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली जाईल, असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नरपड गावातून सुरू झालेला वावर

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नरपड गावात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या एका वासराला ठार केले होते. या घटनेनंतर काही दिवसांनी, लगतच्या चिखले गावात काकडपाडा आणि घोलवड गावच्या सीमेलगतच्या विजयवाडी येथेही बिबट्याचा वावर आढळून आला होता. वन विभागाने याची पुष्टी केल्यानंतर, विजयवाडी येथे एक ट्रॅप कॅमेरा बसवला असून काकडपाडा येथे चार कॅमेरे लावण्यात आले आहेत.

वन विभागाकडून नागरिकांमध्ये जनजागृती आणि भरारी पथकाकडून परिसरात गस्त घालण्यात येत आहे. तसेच, या परिसरातून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पंचायत समिती आणि शाळांना कळविण्यात आल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने नरपड, चिखले आणि घोलवड या तिन्ही ठिकाणी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, बिबट्याचा लवकरात लवकर पकडण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.