लोकसत्ता वार्ताहर

डहाणू : डहाणू तालुक्यातून वडिलांकडून पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. २०२० पासून वडिलांकडून मुलीवर अत्याचार सुरू असल्याची माहिती समोर येत असून पोलिसांकडून शाळा महाविद्यालयात सुरू असलेल्या लैंगिक जनजागृती कार्यक्रमानंतर विद्यार्थिनीने आपल्या शिक्षिकेकडे या घटनेची माहिती दिली आहे. या प्रकरणी बुधवार ९ ऑक्टोंबर रोजी डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डहाणू तालुक्यातील एका निवासी शाळेत शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलीवर वडिलांकडून चार वर्षांपासून (मुलगी ११ वर्षांची असल्यापासून) अत्याचार सुरू असल्याचा आरोप मुलीने केला आहे. शाळेत शिकणारी मुलगी सुट्ट्यांमध्ये घरी गेल्यावर वडील तिच्यावर अत्याचार करत असून यंदा गणपतीच्या सुट्टीत मुलगी घरी आल्यावर देखील वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याचे मुलीने तक्रारीत सांगितले आहे. शाळेतील शिक्षिकेने विद्यार्थिनीला विश्वासात घेत या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन पोलिसांना कळवले असून याबाबत शाळेतील इतर विद्यार्थांना माहिती होणार नाही याची दक्षता शिक्षिका आणि पोलिसांनी घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा-शाळेच्या आवारात मुलावर अत्याचार, अनैसर्गिक कृत्य प्रकरणी शाळकरी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांकडून सध्या शाळा, महाविद्यालयात लैंगिक जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. यासाठी महिला पोलिसांकडून शाळांमध्ये जनजागृती करून विद्यार्थिनींना विश्वासात घेत विचारपूस करण्यात येत आहे. अश्याच एका जनजागृती कार्यक्रमानंतर शाळेतील विद्यार्थिनीने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराची माहिती शिक्षीकेकडे दिली आहे. या प्रकरणी डहाणू पोलीस ठाण्यात पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डहाणू पोलीस करत आहेत.