पालघर : मागील महिन्यात केळवे रोड येथे एका महिलेची छेडछाड करणाऱ्या आरोपीला महिलेने ११२ क्रमांकावर तक्रार केल्यानंतर सफाळे पोलिसांनी तात्काळ जाऊन अटक केली होती. हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालविण्याबाबत सफाळे पोलिसांनी विनंती केल्यानंतर २९ दिवसात या गुन्ह्यावर निकाल लावण्यात आला. यामध्ये त्या आरोपीला एका वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली.
३० मार्च रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास केळवे रोड पूर्व येथील धोंदलपाडा या भागात सामान घेऊन पायी जाणाऱ्या एका महिलेची केळवे रोड पूर्व येथे राहणारा मुलगा त्या मुलीच्या जवळ आला. त्यामुळे मुलीने बाजूने जाण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्या मुलीच्या हाताला पकडून तोंड दाबून मानेला पकडले. त्यावेळी त्या मुलीने जोरात झटका देवून स्वतः ला सोडवून पळण्याचा प्रयत्न केला.
या झटापटीत आरोपीने पिडीत मुलीची साडी पाठीमागून पकडून विनयभंग केला. या प्रकरणाबाबत मुलीने 31 मार्च रोजी 112 क्रमांक वर संपर्क करून संबंधित मुलाची तक्रार केली. तक्रारीनंतर 20 मिनिटात सफाळे पोलीस हजर होऊन त्यांनी त्या मुलाला ताब्यात घेतले. याबाबत त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिलांनी देखील साक्ष दिली.
या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना माहिती मिळताच गुन्हयात सबळ पुरावे प्राप्त करुन तात्काळ आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे असे आदेश सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांना दिले. त्यानंतर गुन्ह्यातील पुरावे गोळा करुन २४ तासात प्रथमवर्ग न्यायंदडाधिकारी पालघर येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, सरकारी वकील व सफाळे पोलीस ठाणे यांनी २९ दिवसांच्या आत या गुन्हयातील पिडीत फिर्यादी, साक्षीदार, पंच यांना पडताळणी करुन २९ एप्रिल रोजी आरोपीस १ वर्ष कारावास व ५००० रुपये दंड ही शिक्षा ठोठावलेली आहे. इतका त्वरित निकाल अद्याप पर्यंत महाराष्ट्रात लागला नसल्याचा अंदाज सफाळे पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गुन्हा फास्टट्रॅकवर चालविला
महिलांवर कोणताही अतिप्रसंग होऊ नये या दृष्टीने पालघर पोलीस प्रयत्न करत असून संबंधित महिलेवर घडलेल्या विनयभंग प्रकरणी संबंधित आरोपीवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या दृष्टीने गुन्हा फास्टट्रॅक वर चालविण्याबाबत न्यायालयाला सफाळे पोलीस ठाणे यांनी विनंती केली. या प्रकरणात आठव्या दिवशीच निकाल लागणे शक्य होते मात्र आरोपीच्या वकिलांनी वेळ घेतल्याने 29 दिवसात हा गुन्हा निकाली लागला आहे.
दयेच्या अर्जामुळे एक वर्ष शिक्षा कमी
या प्रकरणाबाबत आरोपीला दोन वर्ष कारावास व दहा हजाराची शिक्षा उठविण्यात आली होती. मात्र आरोपीच्या वकिलांनी आरोपीचे कुटुंब असल्याने त्याला शिक्षेत कमी करावी असा दयेचा अर्ज केल्यामुळे आरोपीला एका वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.
११२ क्रमांकाला महिलांचा प्रतिसाद
महिलांवर अतिप्रसंग झाल्यावर 112 क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून वारंवार करण्यात येते. महिन्याभरात 60 ते 70 कॉल या तक्रारींबाबत दाखल होत असल्याचे सफाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ता शेळके यांनी सांगितले. तसेच अशा काही घटना घडल्यास महिलांनी त्वरित पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.