पालघर : शुक्रवारी साजरा होणाऱ्या नारळी पौर्णिमा व शनिवारी रक्षाबंधन निमित्त लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत उत्साह दिसून येत आहे. किनारपट्टीभागात परंपरागत पद्धतीने नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी कोळीवाडे सजत आहेत तर बाजारात ठीकठिकाणी रंगीबेरंगी राख्या खरेदीकरिता स्टॉलवर तरुणींची गर्दी दिसून येत आहे.
श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमा हा पालघर जिल्ह्यातील कोळी बांधवांसाठी एक उत्साहाचा दिवस असतो. या दिवशी समुद्राची पारंपरिक पूजा करून त्याला नारळ अर्पण केला जातो. पालघर जिल्ह्याला झाई बोर्डी ते वसई दरम्यान ११२ किलोमीटर मोठा समुद्रकिनारा लाभला असल्याने नारळी पौर्णिमेचा उत्साह येथे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील विविध गावांमध्ये कोळी बांधव पारंपरिक वेशभूषा परिधान करून एकत्र येत समुद्राची पूजा करतात.
पावसाळ्यामुळे समुद्रातील मासेमारी पूर्णतः बंद असते. बंदीचा कालावधी संपुष्टात आल्याने किनाऱ्यावर साकारलेल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या आहेत. नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण केल्यावर मासेमारीला पुन्हा सुरुवात करण्याचे पारंपरिक श्रद्धा आहे. त्यामुळे कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आणि मासेमारीमध्ये भरपूर उत्पन्न मिळण्यासाठी प्रार्थना करतात.
या निमित्ताने किनारपट्टीवरील गावांमध्ये पारंपरिक गाणी, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिला पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करून, समुद्राची ओटी करतात. त्यानंतर एकत्र येऊन पारंपरिक गाण्यांवर कोई नृत्य सादर करतात. नारळी पौर्णिमा हा सण केवळ मासेमारी सुरू करण्याचा उत्सव नसून, निसर्गाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीवर या सणाला एक वेगळाच उत्साह संचारतो.
शुक्रवारी असणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने पालघर शहरातील बाजारपेठेत तरुणींनी लुगडे निवडणे, लुगड्याला साजेशा बांगड्या, नथ, कंबर पट्टा, हार, पैजण, आदी खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. यासह शनिवारी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधन करिता बाजारात विविध प्रकारच्या राख्या खरेदीकरिता महिलावर्ग गर्दी करतांना दिसत आहेत. १० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत कार्टूनच्या राख्यापासून चांदीच्या राख्यांनी बाजार फुलला आहे.
कोळीगीतांवर सरावाला सुरुवात
सण आयलाय गो,आयलाय गो नारली पुनवेचा,मन आनंद मावना कोल्यांच्या दुनियेचा!, अरे बेगीन, बेगीन चला किनारी जाऊ देवांच्या पूजेला, हात जोडूनी नारळ सोन्याचा देऊया दर्याला! असे पारंपरिक वेषभूषेत नाचत गात दर्याच्या पूजेला जाण्यासाठी स्थानिक तरुण – तरुणी गाण्यांचा जोरदार सरावात व्यस्त झाले आहेत. तरुणांची बेंजो, सोनेरूपी नारळची तयारी करणे, कोळी गाण्यावर नृत्य बसविणे आदींचा सराव करण्याची धावपळ सुरू झाली आहे.