पालघर: शुक्रवार संध्याकाळपासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार बॅटिंग सुरू केली असून आज सकाळपासून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान विभागाने दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर केला. जिल्ह्यात सातत्याने ५० ते ६० मिलिमीटर पाऊस पडत असून शेतीच्या कामांना चालना मिळाली आहे. तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचे स्त्रोत असलेल्या विहिरी, धरणे, तलावांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे.
जून महिन्यापासून काहीशा प्रमाणात मंदावलेल्या पावसाने १ जुलै पासून जिल्ह्यात सातत्याने सुरुवात केली असून शुक्रवार संध्याकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर शहरासह बोईसर, डहाणू, तलासरी, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर एका दिवसात जिल्ह्यात सरासरी २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने शनिवार व रविवारी पालघर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. पाच व सहा जुलै रोजी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र ६ जुलै रोजी पावसाने सर्वत्र धुवाधार हजेरी लावल्यामुळे हवामान विभागाकडून दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ऑरेंज अलर्ट काढून जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला. शाळा व कार्यालयांना आज सुट्टी असल्यामुळे तारांबळ उडाली नसली तरीही इतर कामगार वर्गाचा या पावसामुळे खोळंबा झाला.
सध्याच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अनेक नाले तुडुंब भरले असून, काही ठिकाणी नाले ओसंडून वाहत आहेत. विशेष म्हणजे रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचे तोल जाऊन पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
सुट्टी व पाऊस यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह
आषाढी एकादशी, मोहरम ताजिया सण व रविवार सुट्टी असल्यामुळे पावसाळी वातावरणामुळे पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. अनेक पर्यटकांनी सणाचा दिवस असल्यामुळे सकाळच्या सत्रात मंदिरात जाऊन दर्शन घेतले तर दर्शनाकरिता बाहेर पडण्यासाठी पाऊस कमी होईल या आशेने राहिलेल्या भाविकांना दुपारपासून धुवाधार पावसामुळे बाहेर पडणे अशक्य झाले. तर अनेक हौशी मंडळी कुटुंब व मित्र मंडळांसोबत धबधबे व पावसाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले.
प्रशासनाच्या सतर्कतेमुळे पर्यटकांमध्ये नाराजी
सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी धबधब्यांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणी जाऊन आनंद घेतला. मात्र हवामान विभागाच्या ‘ऑरेंज व रेड अलर्ट’ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नदीकिनारी, धबधब्यांच्या आसपास आणि धोकादायक ठिकाणी जाणे अनेकदा पर्यटक जात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाकडून अनेक ठिकाणी मनाई आदेश जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे उत्साहात असणाऱ्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड झाला. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणीही पर्यटकांकडून होत आहे.
तालुका निहाय ६ जुलै रोजी चा पाऊस (मिलिमीटर मध्ये)
वसई – ४९.५
वाडा – ५५
डहाणू – ५६
पालघर – ५४.८
जव्हार – ६२.५
मोखाडा – ६२.५
तलासरी – ५५.२
विक्रमगड – ५१.५
एकूण – ५४.८