पालघर : यंदाच्या हंगामात पावसाने जुलै महिन्यात उघडीप घेतल्याने चाफा फुलांचे उत्पादन सातत्यपूर्ण व स्थिर राहिल्याने गेल्या काही वर्षांच्या तुलनेत या सुगंधी फुलांना गेल्या काही वर्षांच्या तुलनेत समाधानकारक दर मिळाले आहेत. मात्र करोना काळात चाफा झाडांच्या मशागतिकडे दुर्लक्ष झाल्याने अजूनही त्याच्या उत्पादनावर परिणाम होत असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा फटका देखील पालघर बसला आहे.

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड या भागामध्ये चाफा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून येथील उत्पादित होणारे फुलं दादरच्या फुल मार्केटमध्ये पाठवण्यात येतात. जुलै महिन्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप घेतली असताना पावसाच्या सरी सुरु राहिल्याने चाफ्याच्या झाडाच्या मुळावर साचणाऱ्या पाण्याचा विपरीत परिणाम टाळाला गेला. त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा श्रावणात चाफ्याचे सातत्यपूर्ण व वाढीव उत्पादन बागायतदारांना मिळाले.

करोना काळात बाजार पूर्णपणे बंद राहिल्याने तसेच त्याकाळात या झाडांच्या मशागती करिता शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने बागायतदारांकडूनचाफा झाडांकडे दुर्लक्ष झाले होते. त्यानंतर परिस्थिती सुधारली असली तरी या झाडांमधून मिळणारे उत्पादन अजूनही पूर्ववत झाले नसल्याचे दिसून आले आहे.

केळवे रोड येथील एका बागायतदाराकडे असणाऱ्या जुन्या हजार १५०० झाडांसह ४००० चाफा झाडांची लागवड असून यंदा जुलै महिन्याच्या बहरादरम्यान १० ते २० हजार फुल दररोज निघत होती. मात्र करोना काळापूर्वी याच झाडांमधून या हंगामात २५ ते ३५ हजार फुलांची आवक होत असे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत चाफा फुलांमध्ये झालेली वाढ समाधानकारक असली तरीही अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वधारले नसल्याचे दिसून आले आहे. विरार (नवापूर) येथील एका बागायतदाराकडे असणाऱ्या सुमारे २००० हजार चाफा झाल्यानंतर या हंगामात मिळणाऱ्या ३० ते ४० हजार फुलांच्या उत्पादनाच्या समोर यंदा १० ते १३ हजार फुलांचे उत्पादन मिळाले. गेल्या काही वर्षात याच काळात असणाऱ्या उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे उत्पादन समाधानकारक असल्याचे बागायतदारंकडून लोकसत्ताला सांगण्यात आले.

श्रावण महिन्यात असणाऱ्या सणांच्या निमित्ताने चाफा फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असून गणेशोत्सव काळात या फुलांचा दर दरवर्षी उच्चांक गाठतो असे दिसून आले आहे. यंदाच्या हंगामात गणेशोस्तवादरम्यान चाफा फुलांना २०० ते २५० रुपये प्रति शेकडा इतका घाऊक बाजारात दर मिळेल अशी अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण व मुसळधार पावसामुळे चाफा फुलां च्या उत्पादनात घट होऊन त्याचा परिणाम दसऱ्यापर्यंत जाणवेल असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. करोना काळा दरम्यान ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे काही बागायतदारांनी चाफा लागवड ऐवजी भाजीपाला व इतर कृषी उत्पादनाकडे आपले लक्ष केंद्रित केल्याने चाफा लागवड क्षेत्र कमी झाले आहे. यंदाच्या हंगामात चाफा फुलांना समाधानकारक दर मिळत असले तरी “चाफा बोलेना, चाफा चालेना…” असे म्हणण्याची गत पालघर जिल्ह्यातील बागायतदारवर येऊन ठेपली आहे.

दर समाधानकारक, वाहतुकीची समस्या

राज्यातील विविध भागांमधून चाफ्याची फुल विक्रीसाठी मुंबई बाजारपेठेत येत असून आवक होणाऱ्या फुलांच्या प्रमाणावर बाजार भाव ठरत असतात. जुलै महिन्याच्या चाफा बहरादरम्यान फुलांची आवक स्थिर राहिल्याने (तसेच अचानक मोठ्या प्रमाणात आवक न झाल्याने) यंदाच्या हंगामात बाजार भाव तुलनात्मक चांगले मिळाले. सकाळी बाजारात लवकर पोहोचणार यांना फुलांना १५० ते १८० रुपये शेकडा असा दर प्राप्त झाला असून पूर्वी याच हंगामात चाफा फुलांना मिळणाऱ्या ३० ते ५० रुपये प्रति शेकडा या मिळणाऱ्या दरापेक्षा चांगला असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे करोना पूर्वीच्या उत्पादनाचा तुलनेत सध्याचे उत्पादन ३० ते ४० टक्के असले तरीही दर वधारल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.

सकाळी १० वाजेपर्यंत बाजारपेठेत पोहोचणाऱ्या चाफा फुलांना समाधानकारक दर मिळत असला तरीही त्यानंतर पोहोचणाऱ्या फुलांना प्रति शेकडा ४० ते ६० रुपये कमी दर मिळत असून पालघर जिल्ह्यातील दूरवर वसलेल्या बागायतदारांना ही फुलं बाजारात पोहोचविण्यासाठी असणाऱ्या अडचणी कायम राहिल्या आहेत

मनुष्यबळ व वाहतूक त्रासदाय

चाफा फुलांमधील ताजेपणा कायम राखण्यासाठी वसई तालुक्यातील बागायतदार पहाटे या फुलांची वेचणी करताना दिसतात. मात्र पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पहाटेच्या वेळी फुल वेचण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ग्रामीण भागातील हे वातावरणात सुगंध पसरवणारे फुल पोचण्यास विलंब होतो. त्यामुळे या कोंडीचा फटका येथील बागायतदारांना सातत्याने बसत आहे.

पावसाचा होणारा परिणाम

मुसळधार पाऊस व बागायत क्षेत्रामध्ये साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे चाफा झाडावर विपरीत परिणाम होत असून त्यामध्ये झाडांना विशिष्ट प्रकारचा धक्का (शॉक) बसत असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर होत असून परिस्थिती पूर्वत होण्यासाठी किमान महिन्याभराचा अवधी लागत असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच मुसळधार पावसाळ्यामध्ये या फुलांचे उत्पादन कमी होत असते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

शासकीय योजनांचा लाभ नाही

चाफा, मोगरा व इतर फुलांना मुंबई बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी शासनाने विविध योजना मार्फत बचत गट अथवा बेरोजगार तरुणांना लहान वाहनांना खरेदी करण्यास आर्थिक मदतीचे पाठबळ दिले. मात्र अशा वाहनांमधून बाजारपेठ गाठायला वाहतूक कोंडी, इंधन दरवाढ व इतर अनेक समस्यांच्या सामना करावा लागत असल्याने या वाहन पुरवण्याच्या योजनेचा विशेष लाभ होताना दिसत नाही.