पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला असून मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पालघर शहरासह बोईसर, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर आठवडा अखेर असल्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने शनिवार व रविवारी पालघर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. आज आणि उद्या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, ६ आणि ७ जुलै रोजी पावसाचे प्रमाण वाढेल. या दोन दिवसांत जिल्ह्यात सर्वत्र जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी विशेषतः या दोन दिवसांमध्ये घराबाहेर न पडण्याचे आणि आवश्यक असल्यास बाहेर पडताना योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सध्याच्या पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक प्रमुख रस्त्यांवरून पाणी ओसंडून वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. अर्ध्याहून अधिक नाले तुडुंब भरले असून, काही ठिकाणी नाले ओसंडून वाहत आहेत. विशेष म्हणजे, रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांमुळे ठिकठिकाणी पडलेले खड्डे पावसाच्या पाण्याने भरले आहेत. या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाकीस्वारांचे तोल जाऊन पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालक दोघांनाही मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पर्यटकांचा ओढा, पण सतर्कता आवश्यक
सध्या शनिवार आणि रविवार असल्याने आठवड्याअखेरीस अनेकांनी धबधब्यांकडे आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा बेत आखला आहे. मुसळधार पावसामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच बहरले असल्याने पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. मात्र, हवामान विभागाच्या ‘ऑरेंज अलर्ट’ च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीकिनारी, धबधब्यांच्या आसपास आणि धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.
कृषि सल्ला आणि उपाययोजना
सध्याच्या परिस्थितीमध्ये नवीन लागवड केलेल्या फळांच्या झाडांना पाऊस आणि वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी त्यांना काठीचा आधार देऊन बांधणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका पेरणी केली आहे, त्यांनी भात रोपवाटिकेच्या गादी वाफ्याच्या चारही बाजूंनी खोल चर काढून घ्यावेत, जेणेकरून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल.
या काळात औषध फवारणी आणि खते देण्याची कामे पुढे ढकलण्याचा सल्ला देण्यात आला आहे, कारण पावसामुळे त्याचा योग्य परिणाम होणार नाही. तसेच, भाताची पुनर्लागवड, फळझाडे आणि भाजीपाल्याची नवीन लागवड करणे सध्या टाळावे असे आवाहन जिल्हा कृषि हवामान केंद्र आणि कृषि विज्ञान केंद्र, कोसबाड हिल यांनी शेतकऱ्यांसाठी केले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी मुसळधार पावसाच्या दृष्टीने धोकादायक प्रवास टाळा, जीव धोक्यात घालू नका!’ असे नागरिकांना आवाहन’ केले आहे.
सूचना
- दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओहोळ किंवा पुलांवरून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह ओलांडू नका.
- धोकादायक प्रवास करून आपला जीव धोक्यात घालणे टाळा.
- पुराच्या पाण्यातून पलीकडे जाण्याची परिस्थिती असल्यास, त्वरित शिक्षकांना माहिती द्या.
- झाडांवरून, टायरच्या ट्यूबवरून किंवा राफ्टवरून प्रवास करू नका.
- शॉर्टकट म्हणून धोकादायक मार्गांनी पाण्यातून प्रवास करणे टाळा.
- नियमित रस्ताही पाण्याखाली गेल्यास, पोलीस किंवा तालुका प्रशासनाच्या परवानगीशिवाय प्रवास करू नका.
- जिल्ह्यासाठी ५ आणि ६ जुलै रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ असल्याने विशेष खबरदारी घ्या.